Baner Suicide Case : बाणेर हादरले! नवविवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; धक्कादायक कारण उघड
Baner Suicide Case : नवविवाहितीने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बाणेर भागात घडली. विवाहानंतर तरुणीने तीन महिन्यांत टोकाचे पाऊल उचलले.

Baner Suicide Case – नवविवाहितीने इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बाणेर भागात घडली. विवाहानंतर तरुणीने तीन महिन्यांत टोकाचे पाऊल उचलले. तरुणीच्या वडिलांनी अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गंगा तेजस बेंबळकर (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
या प्रकरणी पती तेजस शिवा बेंबळकर (वय ३१), सासू उज्ज्वला शिवा बेंबळकर (वय ५८), सासरे शिवा माणिकराव बेंबळकर (वय ६२), नणंद रिया शिवा बेंबळकर (वय ३३, सर्व रा. पिओनी सोसायटी, योगी पार्क, बाणेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत प्रा. शरणकुमार मल्लिकार्जुन माशाळ (वय ५९, रा. कर्नाटक हौसिंग बोर्ड, अक्का महादेव काॅलनी, कलबुर्गी, कर्नाटक) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगा आणि तेजस यांचा विवाह गेल्या वर्षी १३ नोव्हेंबरला झाला. तेजस उच्चशिक्षित असून तो आयटी कंपनीत कामाला आहे.
गंगा ही सुद्धा उच्चशिक्षित होती. तुम्ही कन्यादान करा, आम्ही विवाह करुन देतो, असे बेंबळकर मंडळींनी गंगाचे वडील प्रा. शरणकुमार माशाळ यांना सांगितले. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात गंगाचा साखरपुडा झाल्यानंतर बेंबळकर कुटुंबीयांनी गंगाला टोमणे मारणे, अपमान करणे तसेच माहेरहून २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये, अशी मागणी केली.
सासरी त्रास होत असल्याचे गंगा हिने वडीलांना सांगितले. ५ फेब्रुवारीला गंगा तिच्या वडिलांनाही भेटली होती. तेव्हाही हुंड्यावरुन छळ होत असल्याचे तिने वडिलांना सांगितले होते. पुढील महिन्यात भेटतो, असे त्यांनी तिला सांगितले होते. त्यानंतर १९ फेब्रुवारीला बाणेरमधील पिओनी सोसायटीच्या इमारातीतून उडी मारुन गंगाने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरक्षक बाबासाहेब झरेकर तपास करीत आहेत.





