BAN vs AFG : अफगाणिस्तानविरुद्धच्या ODI मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ अनुभवी खेळाडूंंना मिळाला डच्चू…

BAN vs AFG ODI Series : बांगलादेश क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघाची कमान नजमुल हुसेन शांतो याच्याकडे सोपविण्यात आली आहे. गुरुवारी बीसीबी अध्यक्ष फारुख अहमद यांच्याशी शांतोने केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.आश्चर्यकारक बाब म्हणजे शाकिब अल हसन, लिटन दास या वरिष्ठ खेळाडूंना संघात स्थान मिळालेले नाही.
अनामूल हक, तैजुल इस्लाम आणि हसन महमूद यांनाही संघात स्थान मिळालेले नाही. महमूद खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. उभय संघांमधील ही मालिका UAE मधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल, ज्याचे सामने 6, 9 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या मालिकेत बांगलादेश संघाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेला दारुण पराभव विसरण्याचा प्रयत्न असेल.
अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय संघात वेगवान गोलंदाज नाहिद राणाचा समावेश करण्यात आला असून, त्याने आतापर्यंत केवळ कसोटी सामने खेळले आहेत. त्याच्या आतापर्यंतच्या छोट्या कारकिर्दीत त्याने वेग आणि उसळीने खूप प्रभावित केले आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16.46 च्या सरासरीने 26 विकेट्स घेतल्या आहेत.
अफगाणिस्तान मालिकेसाठी बांगलादेशचा एकदिवसीय संघ: सौम्या सरकार, तंजीद हसन तमीम, जाकिर हसन, नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, तौहीद हृदोय, जेकर अली अनिक, मेहदी हसन मिराज (उपकर्णधार), रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नाहिद राणा.



