“पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडियावर बंदी घाला”; पंतप्रधानांकडे सिने असोशिएशनची मागणी

दिल्ली : ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी चित्रपट कलाकारांच्या सोशल मीडिया हँडल, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर बंदी घालण्यात आली होती. परंतु अलीकडेच काही पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया अकाउंटवरून बंदी उठवण्यात आली असून सध्या यावर चर्चा होत आहेत.
या प्रकरणावर ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया हँडलवर तात्काळ पूर्ण बंदी घालावी असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
असोसिएशनने त्यांच्या अधिकृत हँडलवर एक ट्विट करून या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. मावरा होकेन, यमना झैदी आणि सबा कमर सारख्या अनेक पाकिस्तानी चित्रपट स्टार्सच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि पाकिस्तानी चॅनेल्सवरील बंदी भारतात उठवण्यात आली आहे हे पाहून अत्यंत चिंता वाटते.
ही केवळ डिजिटल उपस्थिती नाही तर आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि सैनिकांच्या बलिदानाचा अपमान आहे असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, असोसिएशनने भारतात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यांचा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये २६/११ आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यांची माहिती आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन व्यतिरिक्त, आता इतर ४ स्टार्सचे अधिकृत इंस्टाग्राम हँडल भारतातही दिसत आहेत. यामध्ये सबा कमर, यमना झैदी, अहद रझा मीर आणि दानिश तैमूर सारख्या अनेक पाकिस्तानी स्टार्सची नावे आहेत. याशिवाय, क्रिकेटपटू शोएब अख्तर आणि शाहिद आफ्रिदी यांच्या यूट्यूब चॅनेल्सवरील बंदी भारतातही उठवण्यात आली आहे.





