नवी दिल्ली – संसदेत बोलताना दोन्ही सभागृहांतील सदस्य अशा शब्दांचा वापर करतात की नंतर ते शब्द कामकाजातून वगळले जातात. आता यापुढे लोकसभा आणि राज्यसभेच्याही कामकाजाच्या वेळी असे काही शब्द वापरले गेलेत तर ते असंसदीय मानले जाणार आहेत. त्यात भ्रष्ट, जुमलजीवी आदी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.
लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची एक सूचीच आता तयार केली आहे. ही यादी सगळ्या सदस्यांना पाठवण्यात आली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी या यादीला आक्षेप घेतला आहे. नव्या नियमांनुसार गद्दार, घडियाली आसू (मगरीचे आसू), जयचंद, शकुनी आदी अनेक शब्द असंसदीय ठरवण्यात आले आहेत. तसेच काही म्हणींच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, सचिवालयाच्या या नियमानंतरही तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य डेरेक ओब्रायन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपण या शब्दांचा वापर करणारच. तुम्ही मला निलंबित करा असे आव्हान त्यांनी दिले आहे. काही दिवसांतच संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे अन् संसद सदस्यांसाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. आता संसदेत भाषण करताना या मूलभूत शब्दांचा वापर करण्याची आम्हाला परवानगी नाही. लाज वाटली पाहिजे, दुर्व्यवहार केला, धोका दिला, भ्रष्ट, पाखंड, अक्षम हे शब्द बॅन केले आहेत. मात्र, मी त्यांचा उपयोग करणार असे ओब्रायन यांनी म्हटले आहे. मला निलंबित करा. मी लोकशाहीसाठी लढा देणार.
“अतिवृष्टीमुळे जनता हैराण; नवीन सरकार मात्र मंत्रीमंडळ विस्तारातच व्यस्त”
दरम्यान, एका अक्षम सरकारने भारतीयांना कसा धोका दिला हेही मी म्हणू शकणार नाही? तुम्हाला या ढोंगीपणाची लाज वाटली पाहिजे, असे तृणमूलच्याच अन्य सदस्या महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे. तर मोदी सरकारचे खरे रूप सांगणारे शब्द असंसदीय मानले जातील. आता पुढे आणखी काय नवीन असणार विषगुरू असा खोचक सवाल कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी विचारला आहे.
राष्ट्रपती निवडणुकीतही ऑपरेशन कमळ; यशवंत सिन्हा यांचा आरोप