Nagar | शाळेच्या परिसरात एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

संगमनेर, (प्रतिनिधी) – आमदार सत्यजित तांबे यांनी एनर्जी ड्रिंक किती घातक आहेत हे सभागृहात मांडल्यानंतर एनजी ड्रिंकच्या विक्रीवर शाळांच्या परिसरातील विक्रीला बंदी घालण्याचा आदेश लवकरच जारी केला जाईल,
अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शुक्रवारी राज्य विधान परिषदेत दिली होती. मात्र, संगमनेर शहरासह तालुक्यात शाळेच्या परिसरात सर्रासपणे एनर्जी ड्रिंक विकले जात असून एका शाळेच्या 500 मीटरच्या आत दारू विक्रीचे दुकान आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
राज्यातील तरुणांचे प्रश्न सभागृहात कायम मांडणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात लहान मुले आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या विषय हाती घेऊन संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले. राज्य सरकारने ‘ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम’ हाती घेतली असताना किराणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिंक हे एखाद्या ड्रग्ज एवढेच घातक असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे.
दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.
तर शाळांच्या ५०० मीटरच्या परिघात उच्च कॅफिन असलेल्या एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालणारा आदेश जारी करेल, असे आश्वासन मंत्री आत्राम यांनी दिले होते. मात्र संगमनेर शहरासह तालुक्यातील शाळांच्या आवारात सर्रासपणे एनर्जी ड्रिंक विक्री केली जाते. याकडेही प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आता संगमनेरकर देत आहेत.




