शिर्डी – शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि फुल विक्रेत्यांमध्ये झटापट झाली. साई मंदिरात हार, फुले आणि प्रसादावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात मंदिर परिसरातील हार, फुल आणि प्रसाद विक्रेते आक्रमक झाले. त्यांनी आंदोलन करून हार, फुले प्रसादावरील बंदी उठवण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. गेल्या 10 महिन्यांपासून ही बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर स्थानिक हार, फुल विक्रेत्यांचा रोजगार अवलंबून आहे. नेमकं मंदिर प्रशासनाने हार, फुल आणि प्रसादावर बंदी घातल्याने स्थानिक विक्रेते अडचणीत आले आहेत. यावरून आंदोलन करत विक्रेते आणि संस्थानच्या सुरक्षा रक्षकांमध्ये आज वादा – वादी झाली. आंदोलकांना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी रोखले. हार, फुले देखील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली. पण यावेळी दर्शन रांगेत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त फूल विक्रेते आणि भाविकांनी यावेळी मंदिरात हार-फुलं नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. साई संस्थानच्या या भूमिकेवर भाविक आणि विक्रेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांसोबत त्यांचा मोठा वाद झाला आणि दर्शनरांगही थांबली होती. अखेर सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडची हार – फुले काढून घेतली आणि मगच त्यांना मंदिरात प्रवेश दिला. विश्वस्तांचा निर्णय हार फुले आणि प्रसाद यांना मंदिरात परवानगी मिळावी, यासाठी ग्रामस्थ आणि विक्रेते गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. याबद्दल खासदार सुजय विखे पाटील यांनी या प्रकरणात मधला मार्ग काढण्याची मागणी केली. विश्वस्त मंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना विश्वासात न घेता आपला निर्णय रेटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा गोंधळ झाला, असे विखे म्हणाले.