Mumbai High Court : ‘सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी, नागरिकांच्या आरोग्याचा बळी देऊन उत्सव साजरे करणे नको’; मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
सण-उत्सव हे ध्वनी आणि वायू प्रदूषण न करताही साजरे केले जाऊ शकतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले.

Mumbai High Court – सण-उत्सव हे ध्वनी आणि वायू प्रदूषण न करताही साजरे केले जाऊ शकतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. तसेच, रस्त्यांवर फटाके फोडण्यावर उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुनावणी करताना न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने धार्मिक मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, डीजे आणि लेझर बीमचा वापर पूर्णपणे अनाठायी असल्याचे म्हटले आहे.
सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडणे केवळ धोकादायकच नाही, तर त्यामुळे विषारी प्रदूषण होते. मुंबईत या काळात हवेचे प्रदूषण वाढू लागते, त्यामुळे दिवस असो वा रात्र, सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
असे लाऊडस्पीकर आणि फटाके वाजवून आपल्याला देवाची अतिरिक्त कृपा मिळणार का? पंढरपूरची वारी किती शांततेत पार पडते, तिथे कोणतेही लाऊडस्पीकर किंवा गोंगाट नसतो, असे उदाहरण न्यायालयाने दिले.
मुंबई पोलिसांनी ९ ते २६ सप्टेंबर दरम्यान विनापरवाना ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालणारा आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात त्याचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
नियमांची केवळ कागदावर अंमलबजावणी नको, तर ती कठोरपणे झाली पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले. ज्या मिरवणुका किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून पोलिसांची परवानगी घेतली जाते, त्यांनी ती ठळकपणे दर्शनी भागात लावली पाहिजे.
तसेच, नियमांचे उल्लंघन झाल्यास जप्त केली जाईल अशी मोठी सुरक्षा ठेव प्रशासनाने सणांच्या परवानगीसाठी मागितली पाहिजे, जेणेकरून वचक निर्माण होईल, असे न्यायालयाने सुचवले.
न्यायालय कोणत्याही सण किंवा उत्सवाच्या विरोधात नाही, मात्र नागरिकांच्या आरोग्याचा बळी देऊन उत्सव साजरे केले जाऊ शकत नाहीत. नागरिकांना मूकपणे त्रास सहन करावा लागणाऱ्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.





