मंचर, (प्रतिनिधी) – श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसरामध्ये प्लॅस्टिक गंगाजल बाटली व दुध पिशवी आणण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्र्यांनी दिली. श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात. पौर्णिमेनंतर म्हणजेच यावर्षी २२ जुलैपासून उत्तर भारतीय भाविकांचा श्रावण सुरू झाला आहे. येथून पुढे ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २६ ऑगस्ट व २ सप्टेंबर असे सात सोमवार येत आहेत. भाविक श्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात शिवलिंगावरती गंगाजल व दूध वाहतात. हे दोन्हीही प्लॅस्टिक पिशवी किंवा बाटलीमध्ये आणले जाते. विशेषतः भीमाशंकर परिसरामध्ये यात्रेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पिशवी व बाटल्यांची विक्री केली जाते. प्लॅस्टिक हा अविघटनशील पदार्थ असून, शिवाय पर्यावरणदृष्ट्याही घातक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामध्ये गंगाजल, गुलाबजल बाटली, प्लास्टिक पिशवीमधील दूध याचे प्रमाण खूप आहे. मुख्यत्वेकरून उत्तर भारतीय लोक पूजेसाठी ह्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसर प्लास्टिकमुक्त व प्रदूषण मुक्त करण्याचा मुख्य उद्देश समोर ठेवून श्री क्षेञ भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, विश्वस्त, ग्रामस्थ, गुरव, पुजारी, ब्रम्हवृंद, संस्थान कर्मचारी, बैठकीमध्ये प्लॅस्टिक गंगाजल बाटली व दूध पिशवी आणण्यास बंदीचा निर्णय घेण्यात आला. ह्या व्यतिरिक्त लोटी, ग्लास, तांब्यामध्ये वाहण्यास काही हरकत नाही, असे ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे यांनी सांगितले. भीमाशंकरला वर्षभर देशाच्या कोनाकोपऱ्यांतून लाखो भाविक भक्त येत असतात. विशेषतः श्रावण महिन्यामध्ये भाविकांची उच्चांक गर्दी होते. मूळ श्रावण सुरू होण्याअगोदर पंधरा दिवस म्हणजे पौर्णिमेनंतर उत्तर भारतीयांचा श्रावण सुरु होतो. भाविक हे शिवलिंगावरती वाहण्यासाठी श्रद्धेपोटी प्लास्टिकमध्ये असणारे गंगाजल, दूध पिशवी आणतात. प्लॅस्टिक हे निसर्गासाठी घातक असल्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा निर्णय देवस्थानने घेतला आहे. भाविकांनी तांब्या, लोटी याचा वापर करावा. – मधुकरशास्त्री गवांदे, ज्येष्ठ उपकार्यकारी विश्वस्त भीमाशंकर देवस्थान. श्री क्षेत्र भीमाशंकर हे अत्यंत पवित्र असे ठिकाण असून, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पूर्णतः प्लास्टिकमुक्त व प्रदूषणमुक्त करण्याचा मुख्य उद्देश देवस्थान ट्रस्टनी घेतला आहे. भाविकांनी श्रद्धेपोटी मंदिर व मंदिर परिसरामध्ये गंगाजल, गुलाब जल, प्लॅस्टिक बाटली व दूध पिशवी मंदिर व मंदिर परिसरामध्ये आणू नये. देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे. – दत्तात्रय कौदरे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विश्वस्त.