फटाके फोडण्यास बंदी घाला; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय

नवी दिल्ली – देशात ज्या-ज्या शहरात हवा प्रदूषण अधिक प्रमाणात आहे, अशा ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी, असा निर्णय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने घेतला आहे.
वाढतं प्रदूषण लक्षात घेता नॅशनल ट्रिब्युनल (एनजीटी) यांनी दिल्ली एनसीआरमध्ये आज मध्यरात्रीपासून, म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व फटाक्यांच्या विक्रीवर आणि फटाके फोडण्यावर निर्बंध लावले आहेत.
यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब एनजीटीच्या आदेशात आहे ती म्हणजे, केवळ दिल्लीतच नाही तर, ज्या ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे, त्या ठिकाणीही असाच आदेश लागू करण्यात यावा. त्यामुळे दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये फटाक्यांसंदर्भात कोणता निर्णय घेतला जाणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी एनजीटीने देशातील 18 राज्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. ज्यामध्ये जवळपास अर्ध्या राज्यांनी स्वतः फटाक्यांवर बंदी आणली होती. परंतु, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांनी आतापर्यंत यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
दिल्लीमधील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सतत खराब असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्लीमध्ये सकाळी अनेक ठिकाणी धुरके पसरलेले असतात. तसेच संध्याकाळच्या वेळीही धुरकं पसरलेले पाहायला मिळते.





