Baltic Sea : बाल्टिक समुद्रात नाटो वाढवणार गस्त

ब्रुसेल्स : बाल्टिक समुद्रात नाटोकडून गस्त वाढवण्यात येणार असल्याचे नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी म्हटले आहे. बाल्टिक समुद्राच्या तळापासून जाणाऱ्या केबलबाबत रशियाशी संबंधितजहाजांनी या आठवड्यात घातपात केला असल्याची शक्यता गृहीत धरून फिनलंडकडून या भागात तपास केला जाणार आहे. या पार्श्वभुमीवर रुट यांनी नाटोची गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
समुद्रातून जाणाऱ्या फिनलंड आणि इस्टोनियाला जोडणाऱ्या केबल तोडल्याच्या आरोपावरून फिनलंडच्या अधिकाऱ्यांनी ईगल. एस. नावाचे जहाज ताब्यात घेतले आहे. या जहाजानेच ही केबल तोडल्याचा फिनलंडचा आरोप आहे. पायाभूत सुविधांबाबत घातपात केला जाण्याची ही सर्वात अलिकडील घटना पुढे आली आहे. बाल्टिक समुद्रातून जाणाऱ्या केबलसंदर्भातील घटनेच्या तपासाबद्दल आपण फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशी आपली चर्चा झाली आहे.
या केबल जाणीवपूर्वक तोडल्या गेल्याच्या शक्यतेला गृहित धरून तपास जात आहे. या तपासात अडथळे आणले जाऊ नयेत, यासाठी बाल्टिक समुद्रात नाटोचे सागरी सुरक्षा दल तैनात केले जाईल, असे रुट यांनी म्हटले आहे. फिनलंड आणि रशियामध्ये १,३४० किमीची सीमा आहे. फिनलंडने दशकांपासूनचे तटस्थतेचे जुने धोरण सोडून दिले आणि २०२३ मध्ये नाटोमध्ये सामील झाला आहे.
फिनलंड नाटोमध्ये सामील होण्यास रशियाचा पहिल्यापासून आक्षेप होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देखील अशाच प्रकारे समुद्रतळातील केबल तोडली गेली होती. तेंव्हाही नाटोने सागरी गस्तीसाठी विमाने आणि लांब पल्ल्यांच्या रडार आणि टेहळणीची ड्रोन बाल्टिक समुद्रात तैनात केली होती.





