जामखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार; बळीराजा उद्ध्वस्त, क्षणात होत्याच नव्हतं झालं

जामखेड : गेल्या पाच दिवसांपासून जामखेड तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला, घरांमध्ये पाणी शिरले, तर नदीकाठच्या गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सावरगाव येथे पावसामुळे एक घर कोसळल्याने गौतम बाबासाहेब गोरे (वय 40), त्यांची पत्नी सोनाली (वय 35) आणि मुलगा सार्थक (वय 14) जखमी झाले. गौतम यांची प्रकृती गंभीर असून, तिघांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. पहाटे साडेचार वाजता घडलेल्या या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. शासकीय यंत्रणेने घटनेचा पंचनामा केला आहे.
दिघोळ, साकत, आणि जातेगाव परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला. दिघोळमध्ये रात्रभर पावसाने घरं आणि मंदिरांना पाण्याचा वेढा दिला. मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतांमध्ये पाणी शिरले, जमीन खणली गेली, आणि अनेकजण पुरात अडकले. खर्डा परिसरात एनडीआरएफची टीम मदतकार्यासाठी दाखल झाली आहे.
खैरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात तुफानी पावसामुळे खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. बांधखडक येथील पूल पाण्याखाली गेला असून, दरडवाडी येथील पुलाचा कठडा तुटला आहे. धरणाच्या विसर्गात वाढ झाल्याने वंजारवाडी, तरडगाव, सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर बुद्रुक, पांढरेवाडी, आणि शेळगाव या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खर्डा सिंचन शाखेचे गणेश काळे यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आणि जनजीवनाची हानी पाहता तातडीने मदत आणि पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.





