पुणे : फ्लॅट आणि गोडाऊन देण्याचे आमिष दाखवत तब्बल ६० लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी येथील बिल्डर हुसेन अहमद पठाण यांच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरातील रिअल इस्टेट व्यवहारांमधील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेन पठाण हे अम्मार डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स या कंपनीचे मालक असून, त्यांनी गणेश पेठ परिसरातील ‘अमान प्लाझा’ या प्रकल्पामध्ये फ्लॅट आणि गोडाऊन देण्याचे आश्वासन देत फिर्यादीकडून मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आश्विनी दिलीप सारंदा (३१, रा. गणेश पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १ मार्च २०१६ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने फ्लॅट क्रमांक १ (सुमारे ६०० चौ. फूट) आणि तळमजल्यावरील गोडाऊन क्रमांक १ (सुमारे १९० चौ. फूट) विक्रीसाठी व्यवहार निश्चित केला होता. यासाठी फ्लॅटसाठी सुमारे ३८.४० लाख रुपये आणि गोडाऊनसाठी २१.८५ लाख रुपये, तसेच इतर शुल्क मिळून एकूण ६० लाखांहून अधिक रक्कम स्वीकारण्यात आली. याबाबत २०१६ मध्ये नोटरी करारनामा तसेच नोंदणीकृत करार करण्यात आला होता. मात्र, करारानुसार ३० जून २०२४ पर्यंत संपूर्ण रक्कम अदा करूनही आरोपीने ना फ्लॅटचे, ना गोडाऊनचे खरेदीखत करून दिले. उलट टाळाटाळ करत विश्वासघात केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४२० (फसवणूक), ४६८ (बनावट कागदपत्र तयार करणे), ४७१ (बनावट कागदपत्रांचा वापर) आणि ५०६(२) (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाडे करत असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.