मनीष सिसोदिया यांच्याकडून जामिनासाठी याचिका दाखल

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी जामिनासाठी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ईडी आणि सीबीआयकडून उत्तर मागवले. जामीन मिळण्याची विनंती करताना सिसोदिया यांनी ते १६ महिन्यांपासून कोठडीत असल्याकडे लक्ष वेधले आहे.
तसेच, मागील वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये खटल्याची प्रक्रिया ज्या टप्प्यावर होती; अजूनही तिथेच असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांच्या याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली. त्या प्रकरणी आता २९ जुलैला सुनावणी होईल. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने मागील वर्षीच्या २६ फेब्रुवारीला सिसोदिया यांना अटक केली.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याचा आधार घेऊन ईडीने मनी लॉण्डरिंग प्रकरणी त्यांना मागील वर्षीच्या ९ मार्चला अटक केली. सीबीआयने अटक केल्यानंतर दोन दिवसांनी सिसाेदिया यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सीबीआय आणि ईडीशी संबंधित दोन्ही प्रकरणांत जामीन मिळावा यासाठी त्यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत.





