Lok Sabha Election 2024 : मायावतींचा ‘महाराष्ट्रा’वरही फोकस; राज्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिला ‘हा’ आदेश

लखनौ – बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांचा राजकीय फोकस महाराष्ट्रावरही असल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले. त्यांनी पक्षाच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्याचा आदेश दिला.
पुढील लोकसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मायावती यांच्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या राज्यनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बसपचे संस्थापक कांशीराम यांची कर्मभूमी असणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप पक्ष मोठी राजकीय ताकद बनू न शकल्याबद्दल मायावती यांनी खंत व्यक्त केली.
सत्तासंघर्ष, राजकीय स्वार्थ आणि वैरामुळे महाराष्ट्रात राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. त्यामुळे जनहित प्रभावित झाले आहे. ती बाब यातनादायी आहे. सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्रात मुदतीआधीच विधानसभा निवडणूक होऊ शकते.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होऊ शकतात. त्यामुळे पूर्ण ताकद लावून पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48, तर विधानसभेच्या 288 जागा आहेत. ते सर्व मतदारसंघ पिंजून काढण्याचा आदेश मायावतींनी दिला.





