सुषमा अंधारेंची नितेश राणेंसह भाजपवर जोरदार टीका; म्हणाल्या…

बदलापूर : बदलापूरच्या शाळेमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. या घटनेचा उद्रेक काल पाहायला मिळाला. या अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. तसंच बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलनही करण्यात आलं. लोक आंदोललनातून माघार घेत नव्हते. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने नाईलाजाने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या सगळ्या प्रकरणावरून आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका करत नितेश राणे आणि भाजपवर निशाणा साधला.
उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आक्षेप
बदलापूर अत्याचाराचं प्रकरण फास्ट ट्रॅक चालवणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे. तसंच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, पण उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे. ‘उज्ज्वल निकम हे भाजपचे प्रवक्ते आहेत, ते सरकारी वकील नाहीत. त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली आहे, त्यामुळे उज्ज्वल निकम आम्हाला मान्य नाहीत’, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
नितेश राणेंवर केली टीका
बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे, यावरूनही सुषमा अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. अक्षय शिंदेऐवजी अकबर शेख असता तर नितेश राणेंनी थयथयाट केला असता. तुम्ही जात-धर्म पाहून व्यक्त होणार का? हा हलकटपणा आहे. तुमच्यालेखी लेकीबाळींची सुरक्षा महत्त्वाची आहे का नाही? असा सवालदेखील सुषमा अंधारेंनी यावेळी उपस्थित केला.
फडणवीसांकडे केली ‘ही मागणी’
मागच्या 10 वर्षांपैकी 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका द्यावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.





