रांजणगाव गणपती, (वार्ताहर)- गणेगाव खालसा ते कासारी फाटा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून हा रस्ता असून अडचण व नसून खोळंबा झाला आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्याचे काही काम पुणे जिल्हा परिषदेमार्फत उर्वरित काम पीएमआरडीए अंतर्गत करण्यात आले. हा रस्ता बेट भागातील व गणेगाव परिसरातील नागरिकांना थेट तळेगाव ढमढेरेला जाण्यासाठी अतिशय जवळचा व सोयीचा रस्ता आहे. जुन्या काळी तळेगाव ढमढेरे गाव मोठी बाजारपेठ असताना बेट भागासह मलठण, वाघाळे, शिंगाडवाडी, वरुडे, गणेगाव खालसा, पिंपरी दुमाला परिसतील नागरिकांना दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय जवळचा होता. मात्र, कालांतराने हा रस्ता केवळ स्थानिक शेतकरी शेतात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करू लागले. मात्र, पुणे- नगर महामार्गावर शिक्रापूरला वाहतूक कोंडी वाढताच प्रशासनाला व नागरिकांना या रस्त्याची गरज भासू लागली. २०२१ मध्ये रस्त्याचे भूमिपूजन झाले. रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याची संबंधित ठेकेदारकडून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.