Jammu and Kashmir Election : भाजपशी मागील दाराने वाटाघाटी सुरू? नॅशनल कॉन्फरन्सने फेटाळल्या चर्चा

Jammu and Kashmir Elections – जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सने (एनसी) मागील दाराने भाजपशी वाटाघाटी सुरू केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, अफवा अशा शब्दात एनसीने त्या चर्चा फेटाळून लावल्या.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी ३ टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. आता तेथील निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्या निकालाआधी विविध स्वरूपाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामध्ये एनसी आणि भाजपमधील कथित वाटाघाटींचाही समावेश आहे.
श्रीनगरचे माजी महापौर जुनैद अझिम मट्टू यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्या वाटाघाटींविषयीच्या चर्चांना तोंड फुटले. माजी मुख्यमंत्री आणि एनसीचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांची पहलगाममध्ये भाजपच्या एका प्रतिनिधीशी भेट झाली. त्या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्याचे दिसते, असा दावा त्या पोस्टमधून करण्यात आला.
मात्र, एनसीने निवेदन जारी करून तो दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. इंडिया आघाडीतील घटक पक्ष वगळता इतर कुठल्याच पक्षाच्या संपर्कात आम्ही नाही. पराभव अटळ असल्याची जाणीव झालेले निराधार आरोप करत आहेत.
आमच्यावर विश्वास दर्शवलेल्या जनतेने अफवांकडे, खोट्या दाव्यांकडे लक्ष देऊ नये, असे एनसीने म्हटले. एनसीने कॉंग्रेसशी हातमिळवणी करून जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवली. ते दोन्ही पक्ष इंडियाचे घटक आहेत.





