प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – शेतकरी अन्याय सहन करतो, परंतु कधी पेटून उठत नाही व हेच सरकारने ओळखले आहे म्हणून शेतकऱ्यांवर अन्याय करतात. शेतकऱ्यांना जाती धर्मात बांधून ठेवले आहे. शेतकरी जाती भेद सोडून कधीही एकत्र येत नाही. त्यामुळेच शेतकरी कापला जातो कारण तो कापला तरी ओरडतही नाही. पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ महिने ऊन, वारा पावसामध्ये आंदोलन केले, त्यामध्ये ७०० लोक मरण पावले, परंतु शेतकरी आंदोलनापासून मागे हटले नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारला देखील झुकावे लागले. शेतकऱ्यांनी जर एकी केली तर सरकारला देखील झुकावे लागते, परंतु शेतकऱ्याला कितीही पेटवले तरी तो पेटत नाही. आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन आंदोलन करत नाही म्हणून शेतकऱ्यांची ही अवस्था झाली आहे, त्यामुळे इथून पुढील काळात आंदोलनामध्ये सामील व्हा, असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले.भवानीनगर (ता. इंदापूर) या ठिकाणी श्री छत्रपती कारखान्यावरील पटांगणामध्ये शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी बच्चू कडू बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम उपस्थित होते.बच्चू कडू म्हणाले की, ज्या तालुक्यातील आमदार पाच वर्षाला बदलला जातो तेथील जनता खऱ्या अर्थाने हुशार आहे. ज्या तालुक्याचा आमदार तीस तीस वर्ष राहिला आहे त्या भागातील जनता गुलाम झालेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तिकीट मिळावी यासाठी गुलामी करणे सुरू आहे. राज्याची लोकसंख्या चालली आहे १४ कोटींवर व नोकरीसाठी जागा निघतात ३०० ते ४०० लाख म्हणजेच ३०० ते ४०० परिवारासाठी एक जण नोकरीला लागतोय व तेही कंत्राटी कामगार म्हणून भरती आहे. तुमच्या आरक्षणाचा अर्ज आत्ता गायब केले आहेत. दिव्यांगाना ६०० रुपये पासून ते १००० रुपये झाले व पुढे १५०० केले परंतु ही लढाई आम्ही थांबवली नसून या आंदोलनामुळे याच दिव्यांगांना २५०० रुपये आत्ता केले आहेत.