प्रभात वृत्तसेवा रांजणगाव गणपती – शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि न्याय-हक्कांसाठी दिवाळीनंतर दि. २८ रोजी मुख्यमंत्र्यांच्या गावाला घेराव घालणार असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांनी केली. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आयोजित मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांनी जाती-धर्माच्या आणि राजकीय पक्षांच्या गुलामगिरीतून बाहेर पडून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांमध्ये एकी नसल्यामुळेच शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.पंजाब सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५ हजार रुपये मदत दिली, तर महाराष्ट्र सरकारने एकरी केवळ ४ ते ५ हजार रुपये मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांमध्ये ऐक्य नसल्यानेच त्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेक शेतकरी आज शेती परवडत नसल्यामुळे एमआयडीसीमध्ये कामगार म्हणून काम करत आहेत, ज्यामुळे शहरे फुगवणे हेच सरकारचे धोरण असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे कडू यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी अॅड. राहुल वाळके, अक्षय महाराज नाणेकर, रामहरी दौंडकर यांनीही भाषणे केली. कार्यक्रमास पुणे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कातळे, उपाध्यक्ष संतोष काबाडी, जिल्हा संपर्कप्रमुख अॅड. विजय राऊत, शिरूर तालुकाध्यक्ष अमोल माळवदकर, खेड तालुकाध्यक्ष सुनील जाधव, आंबेगाव तालुकाध्यक्ष जितेंद्र भालेराव, आणि जुन्नर तालुकाध्यक्ष रमेश पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.