T20 Cricket : विराट कोहलीचं रेकॉर्ड उद्ध्वस्त, पाक खेळाडूच्या रडारवर आता रोहित शर्मा…

T20 Cricket : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बाबर आझमने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबर आझमनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 41 धावांची खेळी केली आणि यासह तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला.
या बाबतीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. भारतीय दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे बाबर आझमला आता टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.
आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा …
पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार 192 धावा जमा झाल्या आहेत आणि तो भारतीय दिग्गज विराट कोहलीला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणाऱ्या विराट कोहलीने 125 सामन्यात 4 हजार 188 धावा केल्या होत्या.
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावांची नोंद आहे. या दिग्गज खेळाडूने 159 सामने खेळून 4 हजार 231 टी-20 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. बाबर आझमलाही रोहितचा विक्रम मोडण्याची संधी असेल कारण या दिग्गज खेळाडूने टी-20लाही विश्वचषकानंतर अलविदा केला आहे.





