बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: तिसऱ्या आरोपीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुंबईतील नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाबा सिद्दिकी बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. तीन आरोपींनी हा हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिसऱ्या फरार आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
रात्रीच्या अंधारात पसार झालेल्या आरोपींपैकी दोघांच्या पोलिसांनी शिताफीनं मुसक्या आवळल्या. पण तिसऱ्या आरोपीनं अंधाराचा आणि गोंधळाचा फायदा घेत तिथून पोबारा केला. मात्र, एका फोटोमुळे पोलिसांना आरोपींची ओळख आणि कारस्थानाचा छडा लागल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आम्ही तीन हल्लेखोरांपैकी दोघांना पकडले. त्यानंतर लगेचच आम्ही त्यांचे मोबाईल फोन तपासले. आम्हाला धर्मराज कश्यपच्या मोबाईलमध्ये त्या तिघांचा एक फोटो सापडला. आम्ही जेव्हा कश्यपला त्याबद्दल विचारले, तेव्हा त्याने आम्हाला सांगितले की गेल्या महिन्याभरापासून ते तिघे मुंबईत राहात होते. यादरम्यान ते जुहू बीचवर गेले होते. कारण त्याबद्दल त्यांनी खूप ऐकले होते, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
जुहू बीचवर त्या तिघांनी त्यांचा एक फोटो काढला. कश्यपच्या मोबाईलमध्ये हा फोटो काढण्यात आला. हा फोटो आमच्या तपासात खूप महत्त्वाचा होता. कारण त्यातूनच आम्हाला तिसऱ्या फरार आरोपीची ओळख पटली आणि ते तिघे या कटात एकत्र होते याचाही छडा लागला, असेही त्यांनी सांगितले.





