बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण: एका आरोपीला २१ तारखेपर्यंत कोठडी तर, दुसऱ्या आरोपीचे….

Baba Siddiqui murder case – अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी गुरुनैल सिंगला न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा आरोपी असलेल्या धर्मराज कश्यप याचे वय तपासण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला.
एका आरोपीचे वय १७ असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. दरम्यान, कोर्टाने वकिलांचा युक्तिवाद गांभीर्याने घेत आरोपीची टेस्ट करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. ही टेस्ट होईपर्यंत आरोपी धर्मराज कश्यप पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. पोलिस ही टेस्ट करून आरोपीला पुन्हा कोर्टात हजर करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
युक्तीवाद करताना सरकारी वकिल म्हणाले, आरोपी आपली नावही तपासात वेगवेगळी सांगत आहेत. एखाद्या पिच्चरमधील स्टोरीप्रमाणे हा कट रचलेला आहे. आम्हाला १४ दिवसांची कोठडी मिळायला हवी. आरोपीनी ज्यांना मारले आहे ते राज्याचे माजी राज्यमंत्री असून हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.
यातील आरोपी पुणे आणि मुंबईत राहून बाबा सिद्धीकी यांची रेकी केली होती. या आरोपींना हत्यार कोणी दिले, वाहन कोणी दिले याचा तपास होणे महत्वाचे आहे. या आरोपींकडून २८ जिवंत कातूस सापडली आहेत. मग फक्त बाबा सिद्धीकी यांनाच मारायचा हेतू होता की अन्य ही कोणाला मारण्याचा हेतू होता? यात अन्य दोन आरोपी फरार आहेत.
हे कुठल्या गँगशी जोडलेले आहेत का? असे सवालही सरकारी वकिलांनी न्यायालयात उपस्थित केले आहेत. बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यप याला न्यायमूर्तींनी वय विचारले असता त्याने स्वत:चे वय १७ सांगितले. अल्पवयीन आरोपी म्हणून ट्रीटमेंट मिळावी, अशी मागणीही वकिलांकडून करण्यात आली होता. त्यानंतर न्यायालयाकडून आरोपीचे वय तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी
या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. हिंदी भाषेतील पोस्ट टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केल्याचे म्हटले आहे. आम्हाला सलमान खानसोबत कोणतेही युद्ध नको होते, पण बाबा सिद्दीकींच्या हत्येचे कारण त्यांचे दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेले संबंध होते.
बाबा सिद्दीकी यांची कथित शालीनता हा निव्वळ भ्रम आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिमसोबत मोक्का कायद्यातही त्याचा सहभाग असल्याचे पुरावे आहेत. सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला जो कोणी मदत करेल त्याला त्याची किंमत मोजावी लागेल, असा दावा बिश्नोई गँगने केला आहे.





