Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी झीशान अख्तरला अटक; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्या कार्यालयाबाहेर निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. आता मात्र पोलिसांना मोठी कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याला अटक केली आहे. झीशान अख्तर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येने संपूर्ण मुंबई हादरली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपींमध्ये शुभम लोणकर आणि झीशान अख्तर यांचा समावेश आहे. झीशान अख्तरच्या सांगण्यावरून बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, झीशान अख्तर आणि शुभम लोणकर हे दोघेही बाबा सिद्दीकीची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना सूचना देत होते.
पंजाबमधील जालंधर येथे अटक
मुंबई पोलिस गेल्या अनेक महिन्यांपासून झीशान अख्तरचा शोध घेत होते. त्याला पंजाबमधील जालंधर येथून अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री उशिरा बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व आरोपी पाकिस्तानचे होते. या आरोपींपैकी एकाचे नाव झीशान अख्तर आहे.
अटक केलेल्या आरोपींपैकी एक
सध्या झीशान अख्तरला पंजाबच्या जालंधर पोलिसांनी अटक केली आहे. पंजाब पोलिसांनी पुष्टी केली आहे की झीशान अख्तर हा तोच आरोपी आहे जो बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी होता. त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपींमध्ये शुभम लोणकर, झीशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांची नावे समाविष्ट आहेत. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सक्रिय सदस्य झीशान अख्तर याला पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे. आता पंजाब पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.
कोण आहे झिशान अख्तर?
झीशान अख्तर हा जालंधरमधील नकोदर येथील शंकर गावचा रहिवासी आहे. टार्गेट किलिंग, खून, दरोडा अशा ९ गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड आहे. ७ जून २०२४ रोजी झिशान तुरुंगातून बाहेर आला. तुरुंगातच त्याची लॉरेन्स गँगचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम ब्रारशी याची भेट झाली. त्याच्या माध्यमातून तो लॉरेन्स गँगशी जोडला गेला. गँगस्टर लॉरेन्सच्या सूचनेनंतर झीशानने बाबा सिद्दिकीची हत्या केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी झिशान गुन्हेगार बनला. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली होती.
लॉरेन्स गँगचा गँगस्टर विक्रम ब्रार याच्या सांगण्यावरून झीशानने सौरभ महाकालसह तरणतारणमध्ये पहिला खून केला होता. सौरभ महाकाल हा तोच व्यक्ती आहे ज्याने सलमान खानच्या घरी धमकीचे पत्र फेकून त्याला राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती आणि पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येमध्ये सामील होता. मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वीच अटक केली आहे.





