Shefali Jariwali : ‘काटा लगा’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री ‘शेफाली जरीवाला’चे वयाच्या 42 व्या वर्षी निधन झाले आहे. दि. 27 जून रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तातडीने शेफालीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. तिच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिचा पती परागने पोलिसांनी केलेल्या चौकशीत मोठं विधान केलंय. ज्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं. सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी शेफाली ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘गुल्टोथिओन’ ही दोन औषधं घेत होती. याशिवाय शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, “गेल्या पाच-सहा वर्षांपासून ती तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती. ती एंटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती. शेफाली दोन औषधं घ्यायची, ज्यात ‘व्हिटॅमीन सी’ आणि ‘गुल्टोथिओन’ हे घटक समाविष्ट होते. दरम्यान, अशातच योगगुरु बाबा रामदेव यांनी शेफालीच्या मृत्यूबाबत अजब विधान केलं आहे. त्यांना प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा केला आणि सांगितले की, जे दिसते तसे असते असे नाही. नेमकं बाबा रामदेव काय म्हणाले हे आपण पाहुयात… बाबा रामदेव हे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि योग साधनेसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. ते सातत्याने योगाचा प्रचार करतात आणि लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देतात. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बाबा रामदेव यांना विचारण्यात आले की, ‘शेफाली जरीवाला यांचे वय 42 वर्षे होते आणि सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचे होते. सिद्धार्थ हे बॉडी बिल्डर होते, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते आणि शेफाली जरीवाला देखील अत्यंत फिट होती. त्यांना कोणताही आजार नव्हता, मग असे का घडले?’ यावर बाबा रामदेव म्हणाले की, “सॉफ्टवेअरमध्ये बिघाड होता. लक्षणे ठीक होती, पण सिस्टम बिघडली होती. आपले शरीर हे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर आधारित आहे. बाहेरून निरोगी दिसणारी व्यक्ती आतून निरोगी असेलच असे नाही. आतून आपले शरीर मजबूत असणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.