Baahubali – The Eternal War Part 1: ‘एपिक’नंतर आता ‘बाहुबली’ची कथा एनिमेटेड रूपात पुढे – ‘बाहुबली: द इटर्नल वॉर’चा टीझर प्रदर्शित

Baahubali – The Eternal War Part 1: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रभासच्या ‘बाहुबली’ मालिकेचा एक नवा अध्याय आता एनिमेशनच्या माध्यमातून पुढे नेण्यात येत आहे. ‘बाहुबली द एपिक’ला मिळालेल्या यशानंतर आता या फ्रँचायझीची नवीन 3D एनिमेटेड फिल्म ‘बाहुबली: द इटर्नल वॉर’ लवकरच प्रदर्शित होणार असून, याचा प्रभावी टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ईशान शुक्ला यांनी केले आहे, जे ‘स्टार वॉर्स: व्हिजन्स’ आणि ‘द बँडिट्स ऑफ गोलक’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसाठी ओळखले जातात. टीझरमध्ये ‘बाहुबली’च्या मूळ कथानकाची झलक दिसून येते. विशेषतः इंद्रा आणि बाहुबली यांच्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. टीझरवरून असे स्पष्ट होते की ही कथा बाहुबलीच्या शिवभक्तीवर आधारित असून यात ब्रह्मांडाशी संबंधित काही नवीन घटकही पाहायला मिळतील.
नवीन दृष्टीकोनातील कथा
‘बाहुबली – द इटर्नल वॉर’ची कथा ‘बाहुबली: द बिगिनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’पेक्षा वेगळ्या काळात आणि वेगळ्या नजरेतून मांडली गेली आहे. ही कथा अमरेंद्र बाहुबलीच्या वारशाला नवीन पद्धतीने उलगडते. राजामौली यांनी एनिमेशन दिग्दर्शक ईशान शुक्ला यांच्यासोबत मिळून हा प्रकल्प अत्यंत भव्य आणि अनोख्या शैलीत साकारला आहे.
भारतातील सर्वाधिक खर्चीक एनिमेटेड चित्रपटांपैकी एक
राजामौली यांच्या मते, या चित्रपटाचा खर्च तब्बल १२० कोटी रुपये असून, याची निर्मिती सुमारे अडीच वर्षे चालली. प्रभासलाही या प्रकल्पाबद्दल प्रचंड उत्साह आहे. सुमारे २ मिनिटे २७ सेकंदांच्या टीझरमध्ये अप्रतिम दृश्यसंयोजन आणि उच्च दर्जाचे एनिमेशन पाहायला मिळते.
‘बाहुबली: द इटर्नल वॉर’ भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वाधिक खर्चिक आणि भव्य 3D एनिमेटेड चित्रपटांपैकी एक ठरण्याची चिन्हे आहेत.





