B.T. Deshmukh : माजी आमदार प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचं निधन
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचे अभ्यासक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग २५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख (B.T. Deshmukh) यांचे सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

B.T. Deshmukh : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विदर्भाच्या सिंचन अनुशेषाचे अभ्यासक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग २५ वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख (B.T. Deshmukh) यांचे सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक अत्यंत अभ्यासू, लढाऊ आणि तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
पत्रकारितेपासून विधिमंडळापर्यंतचा प्रवास
१९५७ मध्ये अमरावतीच्या ‘दैनिक हिंदुस्थान’ या वृत्तपत्रातून प्रा. बी. टी. देशमुख (B.T. Deshmukh) यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात पत्रकार म्हणून केली होती. पुढे प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली.
अभ्यासू वृत्ती आणि जनसामान्यांशी असलेली नाळ यामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. अमरावती विद्यापीठाच्या (संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) स्थापनेसाठी त्यांनी केवळ पुढाकारच घेतला नाही, तर त्यासाठी विधिमंडळात सातत्याने मोठा संघर्ष केला.
सलग पाच वेळा पदवीधरांचे प्रतिनिधित्व आणि अनोखा आदर्श
प्रा. बी. टी. देशमुख यांनी १९८० ते २००९ या प्रदीर्घ काळात सलग पाच वेळा अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. सभागृहात त्यांच्या अभ्यासू आणि घणाघाती भाषणांचा दरारा असायचा. त्यांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाची प्रचिती तेव्हा आली, जेव्हा पदवीधरांचे आणि जनतेचे प्रश्न सुटत नाहीत हे पाहून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवले होते.
‘नुटा’च्या माध्यमातून शिक्षकांसाठी संघर्ष
प्रा. बी.टी. देशमुख हे ‘नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन’चे (नुटा) प्रदीर्घकाळ अध्यक्ष होते. ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी प्राध्यापक आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी तसेच शिक्षण क्षेत्रातील अनिष्ट प्रथांविरोधात लढा दिला. ‘नुटा’ बुलेटिनच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर नेहमीच परखड भाष्य केले. विशेष म्हणजे, येत्या २१ जून रोजी या ‘नुटा’ बुलेटिनचा सुवर्णमहोत्सव साजरा होणार होता. हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
विदर्भाच्या सिंचन अनुशेषावर ऐतिहासिक लढा
विदर्भावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि प्रामुख्याने सिंचन अनुशेषाच्या (Irrigation Backlog) मुद्यावर प्रा. देशमुख यांनी सरकारसोबत कधीही तडजोड केली नाही. विदर्भाला त्याचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी आकडेवारीनिशी सरकारला वेळोवेळी धारेवर धरले. त्यांच्या या संघर्षामुळेच सिंचन अनुशेषाचा मुद्दा राज्याच्या मुख्य प्रवाहात आला.
प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजताच अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राचा एक मार्गदर्शक आणि विदर्भाच्या हक्कासाठी लढणारा एक बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.






