B. Saroja Devi : दाक्षिणात्य अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन

बेंगळुरू : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे बेंगळुरूतील मल्लेश्वरम येथील त्यांच्या निवासस्थानी आज निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. कन्नडमध्ये त्यांना प्रेमाने अभिनय सरस्वती (अभिव्यक्तीची सरस्वती) असे संबोधले जात असे. चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधील २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
१९३८ मध्ये बेंगळुरू येथे जन्मलेल्या सरोजा यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास अवघ्या १३ व्या वर्षी सुरू झाला. त्यांनी एमजीआर, शिवाजी गणेशन आणि दिलीप कुमार या सारख्या दिग्गजांसोबत काम केले. त्यांना पद्मश्री (१९६९) आणि पद्मभूषण (१९९२) ने सन्मानित करण्यात आले. सरोजा कन्नड चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार म्हणूनही ओळखल्या जातात.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्यासोबतच्या तमिळ चित्रपटामुळे त्या तमिळ चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनल्या. १९६७ मध्ये त्यांचे लग्न झाले तरी, सरोजा देवींना विशेषतः तमिळ चित्रपटसृष्टीत मागणी होती. त्यांच्या निधनाबद्दल खुशबू, कमल हासन आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.





