दखल : मॉडरेशन स्टुडंटचे की सरांचे?

सध्या बी.एड. प्रात्यक्षिक कामाचे मूल्यमापन त्याचबरोबर वर्षभरातील सर्वच शैक्षणिक व इतर सर्वच कामकाजाचे मॉडरेशन सुरू आहे. मात्र, त्यात काही त्रुटी आहेत, त्याबाबत…
एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांत परीक्षांची रेलचेल चालू असते. त्याचबरोबर त्या ठिकाणच्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या बाबतीतही त्याच पद्धतीने लगबगी चालू असताना दिसून येतात. त्याच धर्तीवर विद्यापीठामध्ये सध्या बी.एड. प्रात्यक्षिक कामाचे मूल्यमापन त्याचबरोबर वर्षभरातील सर्वच शैक्षणिक व इतर सर्वच कामकाजाचे मॉडरेशन सुरू आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे काम सतत प्रत्येक वर्षी चालूच असते परंतु त्यावर कोणीतरी बोलायला पाहिजे. एकंदरीत नियमांचा, विद्यापीठ कायद्याचा विचार जर केला तर बीओएस आणि त्या विद्याशाखेचे अधिष्ठाता यांच्याकडून त्या त्या अभ्यासक्रमात काय असावे, काय नसावे हे ठरवले जाते आणि त्यानंतर विद्यापीठातील प्रशासनाकडे ते पाठविले जातं. त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात विचार केला जातो आणि पुढे हे कामकाज अंमलबजावणीसाठी चालू राहते.
बी.एड. हा अभ्यासक्रम 2013-14 पर्यंत एक वर्षाचा होता. त्यानंतर वर्मा समितीच्या अहवालानंतर दोन वर्षाचा झाला. या दोन वर्षांमध्ये भावी शिक्षक असणार्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विषयाचे प्रात्यक्षिक त्याचबरोबर सराव पाठ छात्रसेवाकाल आणि अशाच प्रकारच्या विविध प्रॅक्टिकलच्या फाइल्स त्यांना तयार कराव्या लागतात. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन त्या त्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक मंडळी करत असतात. वर्षाच्या शेवटी हे मॉडरेशन सर्व कामकाजाचे केले जाते आणि ते मॉडरेशन करताना संबंधित विद्यार्थी समोर असला पाहिजे. कारण ते सर्व काम त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेलं असतं. त्या प्रत्यक्ष कामकाजाचा पडताळा त्या विद्यार्थ्याच्या तोंडून त्याचबरोबर त्याच्याजवळ असणार्या सर्व फाइल्स आणि प्रॅक्टिकल बुक्स यांच्या माध्यमातून घेतला गेला पाहिजे; परंतु सर्व फाइल्स, प्रॅक्टिकल वह्या घेऊन विद्यापीठामध्ये महाविद्यालयांतील प्राचार्य, सर्व प्राध्यापक, क्लर्क, सेवक या सर्वांना एखादी गाडी, टेम्पो करून प्रथम वर्षाचे 100 विद्यार्थी, द्वितीय वर्षाचे 100 विद्यार्थी किंवा काही कॉलेजला प्रथम वर्षाचे 50 विद्यार्थी, द्वितीय वर्षाचे 50 विद्यार्थी अशा पद्धतीने सर्वांच्या त्या फाइल्सने भरलेल्या पिशव्या किंवा गठ्ठे विद्यापीठात घेऊन जावे लागते. ते सर्व त्या मॉडरेशन समितीचे चेअरमन आणि सदस्यांसमोर त्यांनी सांगितलेल्या सीट नंबरच्या फाइलचा गठ्ठा घेऊन त्यांच्यासमोर तपासणीसाठी उभे राहावे लागते.
मग प्रश्न पडतो की त्या त्या महाविद्यालयातील प्राध्यापक त्या त्या विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार सर्व काही आपल्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून घेतो, एखादा विद्यार्थी तो पूर्ण करत नसेल, अर्धवट असेल तर त्याची सुद्धा सर्वस्वी जबाबदारी त्या सहाय्यक प्राध्यापकावर येऊन पडते. कारण त्या समितीचे सदस्य संबंधित प्राध्यापकाचीच परीक्षा आहे काय, या अविर्भावात प्रश्नांचा भडिमार करतात. तरीपण संबंधित प्राध्यापक प्रत्येक कामकाजाविषयी सविस्तर आणि अचूक पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. पण हा सगळा फार्स कोणासाठी? भावी शिक्षकांसाठी का, त्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांसाठी का त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी का त्या महाविद्यालयातील लिपिक आणि सेवकांसाठी? नेमकं कोणासाठी हे चाललंय, याबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे.
आपण भावी शिक्षक घडवतोय, हे घडवत असताना तो संबंधित भावी शिक्षक संबंधित समितीच्या समोर जर नसेल तर विद्यापीठाच्या प्रॅक्टिकल परीक्षेबाबतचा धाक किंवा त्याला ते पूर्ण करावं, चांगल्या पद्धतीने करावं, त्यातून काहीतरी आपणाला मिळावं, आपण क्रिएटिव्ह आहोत हे त्या विद्यार्थ्याला समजायला काहीच मार्ग दिसून येत नाही. या गोष्टीवर विचार करायला हवाच. कारण हा सगळा चाललेला फार्स कुठेतरी बंद करून आपल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतीवर त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटवर विचार व्हायला हवा.
वर्षातले सहा महिने कोणत्या ना कोणत्या शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याने प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून काम करायला हवं. मग ते बी.एड. प्रथम वर्षाचा असो किंवा बीएड द्वितीय वर्षाचा असो. दोन्ही वर्षामध्ये हे प्रत्यक्ष कामकाज जर त्या ठिकाणी टाकलं तर या भारतामध्ये जे काही स्किल डेव्हलपमेंटच्या नावाखाली छोटे छोटे कोर्सेस चालू आहेत आणि त्यातून भविष्यातला एक स्वयंरोजगार निर्मितीचं वार सध्या भारतात आहे; परंतु मुळात शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत डोळसपणे भावी शिक्षकांच्या स्किल डेव्हलपमेंटवर फेस सायकॉलॉजी, चाइल्ड सायकॉलॉजी, मॉब सायकॉलॉजी अशा अनेक बाबींवर अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा.
मॉडरेशनच्या नावाखाली महाविद्यालयातील प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी या सर्वांची जी फरफट चालू आहे ती बंद करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावून, त्यांनी काय काम केलेलं आहे याचा वर्षभरात त्यांचा प्रत्यक्ष पडताळा घेतला पाहिजे. ही बाब विद्यापीठ प्रशासन नक्कीच डोळसपणातून लक्षात घेईल आणि योग्य तो भविष्यात बदल करतील हीच अपेक्षा.





