Ayush Praveen Gold : शॉट पुट आणि हाय जंपमध्ये भारताचा सुवर्ण जल्लोष! जपानच्या मैदानात सलग दोन गोल्ड जिंकत पॅरा खेळाडूंनी रचला इतिहास
Ayush Praveen Gold : आयुष वर्माने २०२६ आशियाई पॅरा गेम्समध्ये शॉट पुट एफ५३ प्रकारात ८.१६ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेतील आयुषचे हे दुसरे पदक आहे.

Asian Para Games 2026 Ayush Verma Shot Put Gold Praveen Kumar High Jump Record : जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड कायम असून २१ ऑक्टोबरचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. भारताचा स्टार पॅरा ॲथलीट आयुष वर्मा याने पुरुषांच्या गोळाफेक (शॉट पुट) एफ५३ प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर उंच उडीमध्ये (हाय जंप) प्रवीण कुमार याने नव्या ‘गेम्स रेकॉर्ड’सह सुवर्ण कामगिरी केली. याच प्रकारात बंटीने रौप्यपदक पटकावत भारताला दुहेरी यश मिळवून दिले.
पाचव्या प्रयत्नात ८.१६ मीटरचा थ्रो; आयुष वर्माने जिंकले सुवर्ण
पुरुषांच्या शॉट पुट एफ५३ प्रकारात आयुष वर्माने अत्यंत चुरशीच्या लढतीत ८.१६ मीटरचे अंतर पार करत पोडियमवर अव्वल स्थान मिळवले. आयुषने पहिल्या प्रयत्नात ७.३९ मीटर, दुसऱ्यात ७.४२ मीटर, तिसऱ्यात ७.५० मीटर आणि चौथ्या प्रयत्नात ७.९२ मीटर अंतर गाठले. अखेर पाचव्या प्रयत्नात त्याने ८.१६ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. इराणच्या अलिरेझा हेमामीने ८.०९ मीटरसह रौप्य, तर कझाकस्तानच्या मखाम्बेट सेरिक्कलियेवने ६.८१ मीटरसह कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत आयुषचे हे दुसरे पदक ठरले असून, यापूर्वी २० ऑक्टोबरला त्याने भालाफेक प्रकारात कांस्य जिंकले होते.
२०२० मध्ये सुरुवात; अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक –
10TH GOLD MEDAL AGAYA PRABHU!!! 🏅
– Ayush Verma is the Men’s Shot Put F53 Asian Para Games Champion!!!! 🤩🏆 https://t.co/eHevB03YX3
— The Khel India (@TheKhelIndia) October 21, 2026
१५ जुलै १९९१ रोजी जन्मलेल्या आयुष वर्माने २०२० मध्ये स्पर्धात्मक पॅरा ॲथलेटिक्समध्ये पदार्पण केले होते. प्रशिक्षक रॉबिन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने एफ५३ श्रेणीत सातत्यपूर्ण सराव केला आणि कमी कालावधीत जागतिक स्तरावर छाप पाडली. यापूर्वी झालेल्या पुरुषांच्या भालाफेक एफ५३/५४ स्पर्धेत भारताच्या प्रदीप कुमारने २७.४५ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह सलग दुसऱ्यांदा रौप्य जिंकले होते, तर आयुषने १७.८८ मीटरच्या थ्रोनंतर रझा गुणांच्या जोरावर कांस्यपदक पटकावले होते.
प्रवीण कुमारचा २.०५ मीटरच्या गेम्स रेकॉर्डसह सुवर्ण धमाका –
Heartiest congratulations to Praveen Kumar on winning 🥇 in the Men’s High Jump T64 at the Asian Para Games 2026 with a phenomenal 2.05m jump, setting a NEW GAMES RECORD!
His extraordinary achievement exemplifies determination and excellence, bringing immense pride and glory to 🇮🇳.
#Cheer4Bharat #AsianParaGames2026
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 21, 2026
उंच उडीच्या टी४४/६४ प्रकारात भारताचा पॅरालिम्पिक स्टार प्रवीण कुमार याने २.०५ मीटरची गगनभरारी घेत नवा गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केला आणि दिमाखात सुवर्णपदक जिंकले. त्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मागे टाकत मैदानात नवा इतिहास रचला. त्याच्या या विक्रमी कामगिरीने संपूर्ण क्रीडा संकुलात भारतीय तिरंगा अभिमानाने फडकला.
बंटीची १.९२ मीटरची झेप; भारताची पहिल्या-दुसऱ्या स्थानावर पकड
याच उंच उडी स्पर्धेत भारताचा दुसरा खेळाडू बंटी याने १.९२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम उडी घेत रौप्यपदक आपल्या नावावर केले. उझबेकिस्तानचा तेमूरबेक गियाझोव १.८६ मीटरच्या उडीसह कांस्यपदकावर समाधानी राहिला. एकाच क्रीडा प्रकारात पहिल्या दोन्ही स्थानांवर भारतीय खेळाडूंनी कब्जा केल्यामुळे भारताचा क्रीडा जगतातील दबदबा पुन्हा एकदा सिद्ध झाला.


