– अयोध्या प्रकरणी राम लल्ला विराजमानच्यावतीने दावा
नवी दिल्ली- अयोध्येतील वादग्रस्त भूमीवरील मंदिर पाडूनच मशिद उभारण्यात आली, असा दावा राम लल्ला विराजमानच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायलयातील सुनावणी दरम्यान केला. आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ ऍड. सी.एस. वैद्यनाथन यांनी भारतीय पुरातत्व विभागाचा एक अहवालही सादर केला. पुरात्वखात्याच्या या अहवालामध्ये वादग्रस्त जागेवर मगर आणि कासवाच्या प्रतिमा सापडल्या असल्याचा उल्लेख आहे. मगर आणि कासव हे दोन्ही प्राणी मुस्लिम संस्कृतीसाठी परके आहेत.
राम जन्मभूमी-बाबरी मशिद वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठापुढे सुरू असलेल्या दैनंदिन सुनावणीचा आज आठवा दिवस होता. वादग्रस्त जागी हिंदूंचे मंदिरच होते, हे सिद्ध करण्यासाठी ऍड. वैद्यनाथन यांनी आपल्या निवेदनादरम्यान भारतीय पुरातत्व विभाग (एएसआय)चे आणखी काही अहवाल सादर केले.