अयोध्या: राम मंदिर बाॅम्बने उडवण्याची धमकी

अयोध्या: उत्तर प्रदेशातील अयोध्येतील पवित्र राम मंदिर बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. राम जन्मभूमी ट्रस्टला पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये मंदिरावर हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, हा धमकीचा मेल तमिलनाडूतील एका व्यक्तीकडून पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा तातडीने तपासात गुंतली आहे.
सायबर ठाण्यात एफआयआर दाखल –
धमकी देणारा मेल आल्यानंतर याप्रकरणी अयोध्या सायबर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सायबर सेल या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. काल सोमवारी रात्री राम जन्मभूमी ट्रस्टच्या अधिकृत ई-मेलवर हा धमकीचा मेल आला होता, ज्यामध्ये “मंदिराची सुरक्षा वाढवा” असा इशारा देण्यात आला होता.
शोधमोहीम सुरू
धमकीच्या मेलनंतर अयोध्यासह आजूबाजूच्या बाराबंकी आणि इतर जिल्ह्यांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे. राम जन्मभूमी ट्रस्ट कार्यालयाचे लेखा अधिकारी महेश कुमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापक शोधमोहीम हाती घेतली असून, मंदिर परिसर आणि आसपासच्या भागात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.





