Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी येणार १ किलो सोन्याचे सिंहासन; ‘हे’ व्यापारी करणार दान

Ayodhya Ram Mandir : देशातील ऐतिहासिक अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची अधिकृत तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारी 2024 रोजी मंदिरात प्रभूश्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पूजेचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, या मंदिरातील रामलल्लासाठी तब्बल १ किलोचे सोन्याचे सिंहासन देण्याचा संकल्प एका व्यापाराने केला असल्याची माहिती समोर आली आहे.
आंध्र प्रदेशातील भक्त सी. श्रीनिवासन यांनी प्रभूश्रीरामासाठी एक किलो सोन्याचे सिंहासन दान करणार असल्याचे जाहीर केले आहे. सिंहासनासोबतच श्रीनिवासन 8 किलो चांदीच्या चरण पादुकाही अर्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ते कांची शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचे शिष्य आहेत. या चरण पादुकांसह श्रीनिवासन यांनी 40 दिवस अयोध्येत विविध ठिकाणी पूजा केली आहे.
श्रीनिवासन भगवान रामलल्लाला जी चरण पादुका अर्पण करणार आहेत, त्यात 10 बोटांच्या जागी रत्ने आहेत. एका वर्तमानपत्रानुसार, याशिवाय पादुकांवर भगवान श्रीरामाशी संबंधित गदा, कमळ, स्वस्तिक, सूर्य आणि चंद्र अशी चिन्हे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
श्रीनिवासन यांनी 40 दिवस अयोध्येतील नंदीग्राम, भारत कुंड आणि सूर्य कुंड यांसारख्या ठिकाणी या चरण पादुकांना भेट दिली आणि त्यांची पूजा केली. अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांवर चरण पादुका पूजन करण्यात आले आहे.





