Ayodhya news: अयोध्येच्या मंदिर परिसरात तब्बल ५० लाखांचे दिवे चोरीला

Ayodhya news – अयोध्येतील अतिसुरक्षा क्षेत्रात असलेल्या भक्ती पथ आणि राम पथावर ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तब्बल ३८०० बांबूंचे दिवे आणि ३६ प्रोजेक्टर दिवे चोरीला गेले आहेत.
अयोध्या विकास प्राधिकरणाने दिलेल्या करारानुसार दिवे लावणाऱ्या यश एंटरप्रायझेस आणि कृष्णा ऑटोमोबाईल्स या फर्मच्या प्रतिनिधींनी या संबंधात ९ ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीनंतर रामजन्मभूमी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
रामपथवर तब्बल ६४०० बांबूचे दिवे बसवण्यात आले होते आणि भक्तीपथावर ९६ प्रोजेक्टर दिवे लावण्यात आले. १९ मार्चपर्यंत सर्व दिवे तिथे होते पण ९ मे रोजी तपासणी केल्यानंतर काही दिवे गायब असल्याचे आढळून आले.
आतापर्यंत सुमारे ३८०० बांबूचे दिवे आणि ३६ प्रोजेक्टर दिवे काही अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत, असे फर्मचे प्रतिनिधी शेखर शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
एफआयआरनुसार, कंपनीला मे महिन्यात चोरी झाल्याची माहिती मिळाली, परंतु प्रत्यक्षात ९ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी तेथे पदपथावर हे दिवे लावण्यात आले होते.





