अवसरीच्या विद्यार्थ्यांची वाट पाण्यातून

दोन महिन्यानंतरही पुढाऱ्यांनी घेतला नाही धडा

अवसरी- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या शाळेतील पटांगण आणि वर्ग खोल्यात गुरुवारी (दि. 19) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी घुसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली. दोन महिन्यांपूर्वीही पहिल्या पावसाचे पाणी वर्गात घुसले होते.त्यावेळी गावपुढाऱ्यांनी यापुढे वर्गखोल्या आणि शाळेच्या पटांगणात पाणी येणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते, परंतु गावपुढाऱ्यांना आश्‍वासनांचा विसर पडल्याने पालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अवसरी खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या मुलांच्या मराठी शाळेचे पटांगण आणि वर्गात सुमारे दीड फूट पाणी साचले होते. त्यावेळी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास नकार देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी गावपुढाऱ्यांनी रस्त्यावरुन शाळेच्या पटांगणात येणारे पाणी काढून देण्यासाठी गटार खोदले जाईल आणि पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. गावपुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पालक आणि ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची विनंती केली होती. त्यानुसार पालकांनी विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला होता.

गुरुवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शाळेच्या पटांगणात पाणीच पाणी झाले. या शाळेत इयता पहिली ते चौथीचे प्रत्येकी एक वर्ग आणि अंगणवाडीचा एक वर्ग असे एकूण पाच वर्ग भरतात. तेथे सुमारे 115 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुवारच्या मुसळधार पावसामुळे गावातून वाहून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी शाळेच्या पटांगणात घुसले आणि ते पाणी वऱ्हांड्याला लागले होते. सुमारे एक फुटापेक्षा जास्त पाणी पटांगणात साठले होते. विद्यार्थ्यांना सुमारे अर्धा ते एक फूट पाण्यातून मार्ग काढून पटांगणातून घरी जाण्यासाठी बाहेर पडावे लागले. योग्य खबरदारी घेतली असती पुन्हा ही वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती, अशी भावना पालकांनी व्यक्त केली आहे.साठलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात मच्छर होऊन रोगराई पसरण्याचा धोका आहे. पुढील काळात शाळेच्या परिसरात पाणी साठू नये, अशी व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.