अवधेश प्रसाद यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; विविध मुद्द्यांवर केली चर्चा

मुंबई -उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे (सप) खासदार अवधेश प्रसाद यांनी शनिवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अयोध्या नगरीचा समावेश ज्या मतदारसंघात होतो. त्या फैजाबादमधून विजय मिळवल्याने प्रसाद देशभरात चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे त्यांनी उद्धव यांच्या घेतलेल्या भेटीचे महत्व वाढले.
प्रसाद यांनी उद्धव यांची त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी उद्धव यांचे पुत्र आदित्य तसेच महाराष्ट्रातील सपचे आमदार अबू आझमी आणि रईस शेख उपस्थित होते. त्या भेटीची माहिती देताना आदित्य यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे नमूद केले. त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.
भाजपचे हिंदुत्व राजकीय आहे. प्रसाद प्रदीर्घ काळापासून भगवान श्रीराम आणि अयोध्येतील जनतेची सेवा करत आहेत. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला, असे ते म्हणाले.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत सप आणि कॉंग्रेसचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीने उत्तरप्रदेशात दमदार कामगिरी केली. प्रसाद यांची विजय तर आणखीच लक्षणीय ठरला. विरोधकांची महत्वाची राजकीय कामगिरी म्हणून प्रसाद यांच्या विजयाकडे पाहिले जाते.





