पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागातील मनमानीचा अक्षरश: कहर झाल्याचे बुधवारी (दि. 18) पहावयास मिळाले. आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाची माहिती लपविण्यासाठी नागरवस्ती विभागाच्या “क’ प्रभागातील कार्यालयाला आज (बुधवारी) दिवसभर टाळे ठोकण्यात आले होते. तर समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे हे फोन बंद करून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा अंकुश आहे की नाही? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील अपंग, निराधार, दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविल्या जातात. याच विभागामार्फत पंडित दिनदयाळ उपाध्याय – महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम राबविला जातो. अनेक वर्षांपासून हे काम थेट पद्धतीने आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था करीत आहे. संबंधित संस्थेने प्रशिक्षण दिल्याच्या प्रशिक्षणार्थींची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता या संस्थेची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनीही माहिती उपलब्ध करून देण्याबाबत उपायुक्त अजय चारठणकर यांच्यासह समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे यांना सूचना दिल्या. मात्र ठेकेदारांची तळी उचलण्यात माहीर असलेल्या समाजविकास अधिकाऱ्यांनी आपला फोन बंद करून बाहेर जाणे पसंद केले.
“क’ प्रभागात या योजनेची माहिती जमा करण्यात येते, या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी कार्यरत असलेले रवींद्र गडदरे व जिवराज पोटे हे दोन्ही लिपिक आपला मोबाईल बंद करून गायब झाले होते. विशेष म्हणजे कार्यालय सोडताना या महाशयांनी नागरवस्ती विभागाच्या कार्यालयाला थेट टाळे ठोकले. पालिकेत कार्यरत असलेल्या व नागरिकांप्रती कटिबद्धता पाळण्याच्या आणाभाका घेतलेल्या या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराची तळी उचलण्यात मानलेली धन्यता आश्चर्यकारक मानली जात आहे.
दोन्ही लिपिक आणि समाजविकास अधिकारी गायब झाल्याबाबतची माहिती उपायुक्त अजय चारठणकर यांनाही नसल्याचे समोर आले आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनंतरही ठेकेदारासाठी थेट कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या समाज विकास अधिकाऱ्यासह लिपिकावर महापालिका आयुक्त कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महिलांची हेळसांड
ठेकेदाराच्या हितासाठी नागरवस्ती विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकणाऱ्या या लिपिकांच्या मनमानीचा फटका विधवा महिलांना बुधवारी दिवसभर बसला. करोनामुळे निधन पावलेल्या महिलांना 25 हजारांचे अनुदान देण्याची योजना सुरू आहे. या योजनेसाठी कागदपत्रे सादर करण्यास येणाऱ्या महिलांना कार्यालय बंद पाहून माघारी परतावे लागत होते. अगोदरच विधवा झालेल्या या महिलांची लिपिकांनी केलेली हेळसांड चर्चेचा विषय बनला आहे.
आयुक्त कारवाई करणार का?
महापालिका आयुक्त राजेश पाटील हे शिस्तप्रिय अधिकारी समजले जातात. मात्र याच आयुक्तांनी सूचना केल्यानंतरही समाजविकास अधिकाऱ्यासह लिपिकांनी केलेल्या या कृत्याबद्दल महापालिका आयुक्त काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेतील ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे लागेबांधे तोडावयाचे झाल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करणे महत्त्वाचे बनले आहे.
समाजविकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे व “क’ प्रभागात कार्यरत असलेले दोन्ही लिपिक हे मला कोणतीही कल्पना न देता बाहेर गेले आहेत. ते कोठे आहेत याबाबत आपणाला माहिती नसून, बहाद्दरपुरे यांचा नेहमीच फोन बंद असतो. त्यासाठी आपण यापूर्वी त्यांना समजही दिली होती. आजच्या प्रकाराबाबत आपण या तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविणार आहे.
– अजय चारठणकर, उपायुक्त, नागरवस्ती विभाग