Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

हिमाचल प्रदेशचा बॉक्सर अविनाश जम्वालने कझाकिस्तानच्या अस्तानामध्ये 30 जून ते 7 जुलै 2025 या कालावधीत झालेल्या जागतिक बॉक्सिंग कपमध्ये शानदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. यापूर्वी त्याने ब्राझीलमध्ये झालेल्या या स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. आता अस्तानामध्येही त्याने आपल्या ताकदीची चुणूक दाखवली. अविनाशने या स्पर्धेत माजी ऑलिम्पियन आणि यजमान देशाच्या खेळाडूंना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. फायनलमध्ये त्याचा सामना ब्राझीलच्या यूरी फाल्काओशी झाला. दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त खेळ आणि ताकद पणाला लावली. हा सामना अटीतटीच्या क्षणांपर्यंत रंगला, परंतु 2-3 अशा अत्यंत जवळच्या निकालाने अविनाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अविनाशने उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या माजी ऑलिम्पियन मलिक हसनोव्हला पराभूत करत आपली दमदार वाटचाल कायम ठेवली होती. हिमाचल प्रदेश बॉक्सर संघटनेचे महासचिव एसके शांडिल म्हणाले, “सातत्याने दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर रौप्यपदक जिंकून अविनाशने सिद्ध केले आहे की, तो आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये भारताची मजबूत आशा बनला आहे.”
मोनिका आणि शशीनेही गाजवले नाव
दरम्यान, अमेरिकेत झालेल्या वर्ल्ड पोलीस बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये हिमाचलच्या कन्यांनीही देशाचे नाव उंचावले. शिमल्यातील रामपूरच्या मोनिकाने आपल्या गटात सुवर्णपदक पटकावले, तर किन्नौरच्या शशीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक मिळवले. या तिन्ही खेळाडूंनी आपल्या कामगिरीने हिमाचल आणि भारताचा गौरव वाढवला आहे.





