पहिल्याच दिवशी ‘अवतार 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमाला टाकले मागे

मुंबई – “अवतार 2: द वे ऑफ वॉटर’ हा बहुचर्चित सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटला आला असून, सिनेमागृहात या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार गल्ला कमवला आहे. आश्चर्यकारक स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राउंड स्कोअर मुळे सिनेमाने एक वेगळीच उंची गाठली आहे. हे सर्व पाहणे हा भारतीय प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असल्याचं पाहायला मिळत आहे.
समुद्र आणि त्यांच्यातील बोटीच्या निळ्या जगाची ओळख करून देणारा जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची लोकांमध्ये खूप क्रेझ पाहायला मिळत असून, सिनेमाने ओपनिंगच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने तब्बल 38 कोटींची कमाई केली आहे.
तथापि, इतक्या चांगल्या कामगिरीनंतरही, या वर्षी प्रदर्शित झालेल्या दाक्षिणात्य सिनेमा ‘KGF 2’ चे ओपनिंग डे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडण्यात ‘अवतार 2’ अपयशी ठरला आहे. मात्र, ‘अवतार 2’ मुळे अभिनेता अजय देवगनच्या ‘दृश्यम 2’ या सिनेमाच्या कमाईवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे.
‘अवतार 2’ समोर येताच ‘दृश्यम 2’ची कमाई लाखांवर गेली आहे. ‘दृश्यम 2’ ने सुरुवातीच्या आकडेवारीनुसार 29व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 70 लाखांचा व्यवसाय केला आहे. अशा स्थितीत आता या सिनेमाला 250 कोटींचा आकडा गाठणे फार कठीण वाटत आहे.





