पुणे जिल्हा | अवसरी खुर्द गावचा विद्युत पुरवठा १० तास बंद

मंचर, (प्रतिनिधी) – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) गावात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पाच मिनिटे पाऊस पडला. मात्र, त्यानंतर घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अवसरी खुर्द ग्रामस्थांना रात्र जागून काढावी लागली. १० तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले.
अवसरी खुर्द गावाला गेली पाच महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
अवसरी खुर्द गावात गेली चार ते पाच महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अनेक वेळा दिवस-दिवस विद्युत पुरवठा खंडित होऊन त्याचा परिणाम नळ पाणीपुरवठयावर होत आहे.
नळाला पाणी आले तरी वीज नसली तर दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या अनेक घरांना, टेरेसवरील टाकी भरण्यासाठी मोटारीशिवाय पाणी घेता येत नाही.
त्यामुळे महिला वर्गांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने दिवसाआड केव्हाही नळाला पाणी सोडले जाते. त्यामुळे महिलांना रोजगार बुडवून घरी राहावे लागत आहे.
त्यातच पावसाळा चालू झाल्यापासून महावितरण कंपनीचे पूर्णपणे नियोजन बिघडले आहे. सोमवार रात्री दहा वाजता पाच मिनिटे पाऊस पडला. मात्र, लगेचच संपूर्ण गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अवसरी ग्रामस्थांना रात्र अंधारात जागून काढावी लागते.
रात्रभर अंधार व उकाड्याने झोप न लागल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. सकाळी साडेनऊ वाजता वीस पुरवठा पूर्व झाल्याचे सांगण्यात आले.
महावितरण कंपनीने आपला कारभार सुधारावा. अन्यथा मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाला मोर्चा आणणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) पक्षाचे सुरेश भोर यांनी दिला आहे.
अवसरी खुर्द येथील वीजपुरवठा सुरळीत असताना पाऊस झाल्याने अचानकपणे दोन तारांना जोडणारा जंप केला आणि चीनी मातीची डिक्स खराब झाली. बिघाड लक्षात आल्यानंतर तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. – विवेक शिंदे, शाखा अभियंता, अवसरी खुर्द महावितरण.





