जोशीमठला पुन्हा हिमस्खलन; आठ मृतदेह सापडले; 384 जणांना वाचवले

डेहराडून – उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यातील सुमना भागात हिमकडा कोसळल्याने किमान आठ जण मरण पावले. बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) शिबिरात असणाऱ्या 384 जणांना भारतीय लष्कराने सुरक्षितस्थळी वेळेत हलवल्याने मोठी जीवित हानी टळली. हे आस्मानी संकट शुक्रवारी दुपारी आले.
वातावरण खराब असल्याने मदत कार्य रात्री थांबवण्यात आले. लष्कर या तुकडीतील अन्य सदस्यांचा शोध घेत आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुमना रिमखीम रस्त्यावर सुमनापासून चार किमी अंतरावर हे हीमस्खलन झाले. हा रस्ता जोशीमठ – गिर्थीडोबला – सुमना – रिमखिम मार्गावर आहे. या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी बीआरओच्या कामगारांचे दोन तळ आहेत. सुमनापासून तीन किमी अंतरावर लष्कराची एक छावणी आहे. येथे गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पर्जन्य आणि बर्फवृष्टी होत आहे.
भारतीय लष्करातर्फे तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. येथून 384 कामगारांची सुटका करून त्यांना लष्कराच्या छावणीत आणण्यात आले. अन्य कामगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत आठ मृतदेह हाती लागले आहेत, असे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले.
अनेक ठिकाणी दरड कोसळल्याने चार ते पाच ठीकाणी रस्ता वाहतुकीसाठी बंद पडला आहे. भूपकुंद ते सुमना तेथील रस्त्यावरील राडारोडा बॉर्डर रोडस् टास्क फोर्सने काल संध्याकाळपासून हटवला आहे. या संपर्ण मार्ग खुला करण्यासाठी आणखी सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे.
चामोली जिल्ह्याच्या जोशीमठ भागातील सुमना भागात हीमस्खलनापाठोपाठ बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने मदत कार्यात काल सायंकाळी अडथळे येत होते. त्यामुळे रात्री लष्कराने हे मदत कायर्त हाती घेतले. या तळावर अडकलेल्या 150 कर्मचाऱ्यांची लष्कराने सुखरूप सुटका केली. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.





