वाई अर्बन बँकेच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा

वाई – दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने 9.5 टक्के इतक्या अल्प व्याजदरात सुरू ठेवलेल्या वैयक्तिक वाहन कर्ज योजनेचा फायदा घेऊन, आपले स्वप्न साकार करावे. बँकेच्या माफक व्याजदराच्या कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी केले.
बँकेच्या शिरवळ शाखेच्यावतीने खातेदार सौ. सुजाता धुमाळ यांना संचालक स्वप्निल जाधव यांच्या हस्ते डम्परचे वितरण करण्यात आले. त्यावेळी देव बोलत होते. संचालक अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रीतम भूतकर, भालेराव धुमाळ, महेंद्र शिंदे, सागर भागवत, रामलाल घाडगे, विलास सपकाळ, महेश चव्हाण व शिरवळ येथील खातेदार उपस्थित होते.
देव म्हणाले, बँकेने व्यावसायिक, व्यापारी व उद्योजकांसाठी 9.5 टक्के व्याजदराने वाहन कर्ज, 11.5 टक्के व्याजदराने व्यावसायिक वाहन कर्ज, 13 टक्के दराने कॅश क्रेडिट व स्थावर मालमत्ता तारण मुदत कर्ज योजना उपलब्ध केल्या आहेत. सोनेतारण कर्जासाठी 9.25 टक्के इतका कमी व्याजदर आहे. घरबांधणी कर्जाचा व्याजदरदेखील बँकेने कमी केला आहे. बंगला बांधकाम, नवीन घर व फ्लॅट खरेदीसाठी 10 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बँकेने 25 लाख रुपयांपर्यंत तारणी कर्जे सुरू ठेवली आहे. उद्योजक, व्यापार्यांनी सणासुदीच्या काळासाठी भांडवल उभारणी करून, आपला उद्योग वाढवावा. शाखाधिकारी राहुल चव्हाण यांनी स्वागत केले. बँकेने वाहन खरेदीसाठी कर्ज दिल्याबद्दल धुमाळ दाम्पत्याने आभार मानले.





