– महेश शिपेकर Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहने वजनदार असतील तर त्यांना नेण्यासाठी मोटारीला अधिक ऊर्जा लागते आणि त्याचा परिणाम मायलेजवर होतो. प्रत्येकी शंभर किलो वजनामागे शक्तीचा वापर 2 ते 5 टक्क्यांनी वाढतो. साहजिकच त्याचा मायलेजवर परिणाम होतो. त्यामुळे हलक्या ई वाहनांची मागणी वाढत आहे. भारतात सध्या एक तृतियांश ग्राहक ई वाहनांच्या (Electric Vehicle) वजनावरून चिंतेत आहेत. अधिक वजनाची ई वाहने अपेक्षेप्रमाणे अंतर गाठत नसल्याने बाजारात हलक्या ई वाहनांची मागणी वाढत आहे. ग्राहकांचा हा बदललेला कल पाहता आगामी काळात वाहन कंपन्या ई-वाहनांचे वजन आणखी कमी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. वाहन कंपन्या या इलेक्ट्रिक वाहनांची क्षमता आणि मायलेजमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रयत्न करत आहेत. यासाठी वाहनांत हलक्या वजनाचे सुटे भाग वापरण्याची रणनीती अंगीकारत आहेत. वास्तविक इलेक्ट्रिक वाहने वजनदार असतील तर त्यांना नेण्यासाठी मोटारीला अधिक ऊर्जा लागते आणि त्याचा परिणाम मायलेजवर होतो. या कारणांमुळेच ईव्ही कंपन्या जड पोलादाऐवजी हलके अॅल्युमिनिअम आणि हाय टेंसाइल स्टीलसारख्या साधनाचा वापर करत आहेत. यानुसार गाडीचे वजन कमी करत चांगला मायलेज मिळवणे शक्य होईल. लिथियम-आयन बॅटरीच्या वजनाचा विचार केला तर साधारणपणे ईव्ही वाहनांतील (Electric Vehicle) बॅटरी ही अन्य आयसीई वाहनांच्या तुलनेत 20 ते 30 टक्के अधिक वजनदार असते. अशा स्थितीत त्याचे वजन कमी करण्याबाबतचे प्रयत्न अधिक वेगाने होतील, असे वाहन उद्योगातील तज्ज्ञ सांगत आहेत. Electric Vehicle तंत्रज्ञानातील बदल हलक्या वजनाचे सुटे भाग आणि बॉडी : ‘नोमुरा रिसर्च इन्स्टिट्यूट कन्सल्टिंग अँड सोल्युशन्स इंडिया’च्या तंत्रज्ञान आणि संशोधनाचे समूह प्रमुख हर्षवर्धन शर्मा यांच्या माहितीनुसार, ईव्हीत वजनदार बॅटरी वापरल्यास वाहनांचे वजन आपोआप वाढते. म्हणून मूळ वाहन कंपन्या (ओईएम) या सहयोगी कंपन्यांना सुटे भागाचे वजन कमी करण्याबाबत आग्रह करत आहेत. चेसिस, बॉडी आणि पॉवरट्रेन सिस्टिममध्ये कमी वजनाचे सुटे भाग वापरत गाडीचे वजन कमी करावे, असे उत्पादक कंपन्याचे म्हणणे आहे. एकुणातच वाहनाचे आकलन केल्यास वजनात दहा टक्के घट केल्यास प्रत्यक्षात 4 ते 5 टक्के लाभ मिळू शकतो. शिवाय बेलराइज इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर स्वतिद म्हणतात, बॅटरी इंजिनपेक्षा अधिक वजनदार असेल तर त्यास संतुलित करण्यासाठी चेसिस आणि अन्य मोठे भागाचे (बॉडी इन व्हाइट) वजन कमी करता येऊ शकते. यासाठी चेसिस आणि बीआयडब्लूचे वजन कमी करण्यासाठी हाय टेंसाइल टेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. बॉडी इन व्हॉइट : बीआयडब्लू म्हणजे वाहनांच्या साच्यात वापरले जाणारे सुटे भाग होय. यात साच्यातील बॉडी साइड, छत आणि फुटरेस्ट पॅनल याचा समावेश होतो. या तंत्रज्ञानात पोलादाची जाडी कमी केल्याने केवळ वजनच कमी होत नाही तर सुरक्षेतही सुधारणा होते. अपघाताच्या स्थितीतही वाहन आणि प्रवाशांची सुरक्षा करण्याची क्षमता या तंत्रात आहे. शिवाय ‘पॉवरट्रेन अग्नोस्टिक’चा मार्ग देखील निवडता येईल. अर्थात, त्याची ईव्हीत मोठी मागणी आहे. परंतु आयसीई वाहनांसाठी देखील त्याचा फायदा होतो. आयसीई वाहनांत इलेक्ट्रॉनिक्स फीचर्सचा वापर अधिक असतो आणि ते मुबलक प्रमाणात असतात. एका अभ्यासानुसार, देशातील सुमारे 38 टक्के नागरिक रेंज एंजायटी म्हणजेच एका चार्जिंगवर कमी पल्ला राहत असल्याने ते ईव्हीपासून चार हात लांब राहत असल्याचे म्हणतात. डेलॉयटच्या 2026 च्या ग्लोबल ऑटोमेटिव्ह कंझ्युमर स्टडीच्या मते, सध्या प्रवासी वाहन बाजारात ईव्ही श्रेणीत चार चाकी वाहनांचा वाटा 5 आणि दुचाकीत 6 टक्के वाटा आहे. भविष्यात तो वाढू शकतो आणि यात वाहनांचे वजन कमी ठेवल्यास विक्रीला चालना मिळू शकते. वजनाचा परिणाम कोणत्याही वाहनांचे वजन अधिक असेल तर त्याला वेग देण्यासाठी तितक्याच प्रमाणात शक्ती प्रदान करावी लागते. प्रत्येकी शंभर किलो वजनामागे शक्तीचा वापर 2 ते 5 टक्क्यांनी वाढतो, असे अभ्यासात म्हटले आहे. साहजिकच त्याचा मायलेजवर परिणाम होतो. शहरातील वाहतूककोंडी आणि घाटात तुलनेने ऊर्जा अधिक लागते. बदलाचा ट्रेंड सुझुकीने 2034 पर्यंत आपल्या वाहनांचे वजन शंभर किलोपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याची प्रचिती सुझुकीच्या नव्या मॉडेलमध्ये येते. सुझुकीची इलेक्ट्रिक एसयूव्ही ई व्हिटाराचे उदाहरण घेऊ. या वाहनाचा मायलेज 500 किलोमीटर राहील, यानुसार आखणी करण्यात आली. काही कंपन्या ईव्ही प्लॅटफॉर्मसाठी अॅल्युमिनिअम बॅटरी एनक्लोज करत आहेत. महिंद्रा कंपनीच्या ‘इनग्लो’मध्ये हा बदल दिसतो. शिवाय एक्सईव्ही 9 ई आणि बीई 6 च्या मॉडेलचे देखील उदाहरण घेता येईल. या तंत्राचा वापर करत पोलादी वाहनांचे वजन 40 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते आणि दहा टक्क्यांपर्यंत मायलेज वाढविता येणे शक्य आहे. टाटा कंपनीत एक्टी ईव्ही प्लॅटफॉर्मच्या मदतीने गाडीचे वजन कमी करण्यावर काम केले जात आहे. टाटाने अनेक मोटारीचे वजन कमी ठेवण्याचे तंत्र स्वीकारले आहे. दुचाकी श्रेणीचा विचार केल्यास टीव्हीएसने प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर टीव्हीएस एक्समध्ये एक्सलेटन फ्रेमचा वापर केला. ती एक प्रकारची कास्ट अॅल्युमिनियम अलॉय फ्रेम आहे. त्यास 2023 मध्ये लाँच करण्यात आले. मात्र डिलिव्हरी 2024 च्या अखेरीस झाली. हे वाहन तंत्रज्ञानाच्या आघाडीवर ई स्कूटर श्रेणीत आदर्श मानले जात आहे. बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील कमी वजनावरून चर्चेत आहे. यात अॅल्युमिनिअम डायकास्ट पार्ट्स आणि हाय ग्रेड इंजिनिअर्ड प्लॅस्टिक्सचा वापर केला असून याप्रमाणे वजन संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘विडा व्हीएक्स टू प्लस’मध्ये देखील हेच तंत्र वापरले आहे.