Auto Fare Hike: पुणेकरांच्या खिशाला कात्री! १ सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ; पहिल्या दीड किलोमीटरसाठी आता ‘इतके’ रुपये
Auto Fare Hike: सीएनजीचे वाढते दर आणि महागाईमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १ सप्टेंबरपासून नवीन रिक्षा भाडेदर लागू.

Auto Fare Hike – येत्या १ सप्टेंबरपासून पुणे, पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात नवीन रिक्षा भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरटीओ अधिकारी आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत वाढती महागाई, सीएनजीचे वाढलेले दर आणि रिक्षा देखभालीचा खर्च लक्षात घेऊन हे सुधारित दर जाहीर करण्यात आले. त्यावर जिल्हाधिकारी अंतिम शिक्कामोर्तब करणार असून,
१ सप्टेंबरपासून प्रवाशांना पहिल्या १.५ किलोमीटरसाठी २५ रुपयांऐवजी आता ३० रुपये द्यावे लागणार आहेत. याबाबत रिक्षा पंचायत अध्यक्ष नितीन पवार म्हणाले, नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर प्रमाणीकरण (रिकॅलिब्रेशन) प्रक्रिया वेळखाऊ असल्याने, ती पूर्ण होईपर्यंत प्रवाशांच्या सुविधेसाठी नवीन भाडेदर पत्रक (टॅरिफ कार्ड) वापरण्यास आरटीओने मंजुरी दिल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. (Auto Fare Hike)
रिक्षा पंचायत हे तक्ते चालकांना उत्पादन मूल्यात उपलब्ध करून देणार आहे. पुण्यातील सुमारे दीड लाख रिक्षांचे मीटर कॅलिब्रेशन करण्याची प्रक्रिया जुनाट व त्रासदायक आहे. मीटर कंपन्या सॉफ्टवेअर अपडेटसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारून कोट्यवधी रुपयांची लूट करतात. यावर परिवहन विभागाने नियंत्रण ठेवून भविष्यात थेट जीपीएस व मीटर ॲप तंत्रज्ञानाचा पर्याय निवडावा, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे. (Auto Fare Hike)
अशी आहे भाडेवाढ (Auto Fare Hike)
नवीन भाडेवाढीनुसार प्रवाशांना आता पहिल्या १.५ किलोमीटरच्या किमान प्रवासासाठी २५ रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागतील. त्यानंतरच्या पुढील प्रत्येक किलोमीटरच्या प्रवासासाठी १७ रुपयांऐवजी २० रुपये आकारले जातील. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेतील प्रवासासाठी नेहमीप्रमाणे २५ टक्के अतिरिक्त भत्ता लागू राहील. १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान सर्व रिक्षाचालकांना इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेशन (मीटर बदलून घेणे) बंधनकारक करण्यात आले आहे.





