#AUSvIND 3rd T20 : भारतासमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान

सिडनी – सलामीवीर मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने टाॅस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 गडी गमावत 186 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू वाॅश्गिंटन सुंदरने फिंचला पांड्याकरवी झेलबाद करत शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर मॅथ्यू वेड आणि स्मिथने डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. स्मिथला 24(23) धावांवर त्रिफळाचित करत सुंदरने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. स्मिथ बाद झाला तेव्हा त्यांच्या 9.4 षटकांत 79 धावा झाल्या होत्या.
स्मिथ बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडने मॅक्सवेल सोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या 18.2 षटकांत 169 पर्यंत नेली. मॅथ्यू वेडला पायचित करत शार्दुलने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. वेडने 53 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 80 धावा केल्या. त्यानंतर लगेचच मॅक्सवेल बाद झाला. त्याने 36 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 3 चौकार व 3 षटकार लगावले. त्यानंतर डार्सी शाॅर्ट 7(3) धावांवर धावबाद झाला. मोइसेस हेनरिक्सने नाबाद 5(2) आणि डॅनियल सॅम्स नाबाद 4(2) धावा करत 20 षटकांत संघाची धावसंख्या 186 पर्यंत नेली.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत वाॅश्गिंटन सुंदरने 4 षटकांत 34 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर नटराजन आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 गडी बाद केला. नटराजनने 4 षटकांत 33 तर शार्दुलने 4 षटकांत 43 धावा दिल्याय दिपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांना एकही गडी बाद करता आला नाही. चाहरने 4 षटकांत 34 तर चहलने 4 षटकांत 41 धावा दिल्या.





