T20 World Cup 2024 : पंचांशी हुज्जत घालणं Matthew Wade च्या अंगलट; आयसीसीने उचललं मोठं पाऊल…

बार्बाडोस :- आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील १७ वा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला. इंग्लंड विरुद्धच्या या प्रतिष्ठेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हुज्जत घातली होती.
दरम्यान, मॅथ्यू वेडला (Matthew Wade) पंचांशी हुज्जत घालणे चांगलेच महागात पडले आहे. वेडकडून नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे आयसीसीने वेडवर कारवाईचा बडगा उचलला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना ही घटना घडली. इंग्लंडच्या आदिल रशीद याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18 वे षटक टाकले. रशीदच्या या षटकातील एका चेंडूला वेडने खेळण्यास नकार दिला. रशीदने बॉल टाकण्याआधी मॅथ्यूने त्याला हात दाखवत मी खेळण्यासाठी असमर्थ असल्याचे इशाऱ्याने सांगितले होते. मात्र राशिदने टाकलेला बॉल अशा प्रकारे आला की वेडला बचावासाठी बॅट पुढे आणावी लागली. त्यानंतर मॅथ्यूला हा बॉल ‘डेड बॉल’ असल्याचे जाहीर होईल, असे पंचांकडून अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. पंच नितीन मेमन यांनी बॉल योग्य असल्याचं घोषित केलं, त्यावरून मॅथ्यू वेड संतापला अन् त्याने लाईव्ह सामन्यात पंचांशी हुज्जत घातली.
वेडकडून खेळाडू आणि खेळाडूंसंबंधितांसाठी आयसीसीच्या २.८ या नियमांचे उल्लंघन झाले. या नियमाममध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावरुन असहमती दर्शवण्याची तरतूद आहे. वेडला नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. वेडची गेल्या 2 वर्षातील चूक करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याने आपली चूक असल्याचे कबूलही केले.





