Australia on Iran : ऑस्ट्रेलियाने इराणशी राजनैतिक संबंध तोडले ; इराणी राजदूताचीही हकालपट्टीची

Australia on Iran। ऑस्ट्रेलिया आणि इराणमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या बातम्या येत आहेत, त्यानंतर इराणी राजदूत अहमद सादेघी यांना कॅनबेरामधून हद्दपार करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या गुप्तचर संस्थेने त्यांच्या तपासात,”त्यांच्या भूमीवर झालेल्या किमान दोन यहूदी-विरोधी हल्ल्यांमागे इराणचा हात आहे” असे म्हणत त्यांनी इराणशी असलेले राजनैतिक संबंध तोडले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. त्यांनी यावेळी बोलताना, देशाच्या सुरक्षा गुप्तचर संघटनेने (ASIO) गेल्या वर्षी झालेल्या दोन घटनांमध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ला दोषी ठरवले होते” असे म्हटले. IRGC ने सिडनीमधील एका ज्यू रेस्टॉरंट आणि मेलबर्नमधील अदास इस्रायल सिनेगॉग या ज्यूंच्या प्रार्थनास्थळाला आग लावून लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या घटनांबद्दल अल्बानीज म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन भूमीवर परदेशी राष्ट्राने केलेली ही एक असाधारण आणि धोकादायक आक्रमकता होती.’ त्यासोबतच अल्बानीज म्हणाले की, इराणी राजदूत अहमद सादेघी आणि इतर तीन राजनैतिक कर्मचाऱ्यांना देश सोडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच परदेशी राजदूताला हद्दपार केले आहे.
ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्या नागरिकांना इराण सोडण्याचे आदेश Australia on Iran।
ऑस्ट्रेलियाने त्यांच्या वाणिज्य दूतावास अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून इराणमधील दूतावासाचे कामकाज थांबवले आहे. यासोबतच, ऑस्ट्रेलियाने इराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना देश सोडून जाण्याचे आवाहन केले आहे. अल्बानीज यांनी,” इराणी सैन्याच्या विशेष शाखेच्या आयआरजीसीला देखील दहशतवादी एजन्सी म्हणून सूचीबद्ध केले जाईल. अमेरिकेने २०१९ मध्ये त्याला दहशतवादी गट घोषित करण्यासाठी पावले उचलली.
अल्बानीज पुढे म्हणाले, ‘मी अनेक वेळा सांगितले आहे की ऑस्ट्रेलियन लोकांना दोन गोष्टी हव्या आहेत. त्यांना मध्य पूर्वेतील हत्याकांड थांबावे असे वाटते आणि त्यांना मध्य पूर्व संघर्ष याठिकाणी आणायचा नाही. इराणने नेमके हेच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ज्यू ऑस्ट्रेलियन लोकांना हानी पोहोचवण्याचा, त्यांना घाबरवण्याचा आणि आमच्या समुदायात द्वेष आणि फूट पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.’असे म्हणत इराणवर गंभीर आरोप केले आहेत .
माइक बर्गेस आयआरजीसीबद्दल काय म्हणाले? Australia on Iran।
ऑस्ट्रेलियन गुप्तचर संस्थेचे महासंचालक माइक बर्गेस म्हणाले की,”ऑस्ट्रेलियातील यहूदी-विरोधी हल्ले आयआरजीसीने केले होते आणि त्यांनी हे हल्ले त्यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या गटाद्वारे केले होते. ते म्हणाला, ‘IRGC ने यासाठी अनेक परदेशी लोकांना कामावर ठेवले. नंतर त्या परदेशी लोकांनी ऑस्ट्रेलियातील लोकांना हे काम सोपवले.’
इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा हात असल्याचे सांगितले जात असलेल्या दोन हल्ल्यांपैकी एक म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये सिडनीमधील बोंडी बीचजवळील लुईस कॉन्टिनेंटल किचनमध्ये झालेला जाळपोळ हल्ला. दुसरा हल्ला गेल्या डिसेंबरमध्ये मेलबर्नमधील अदास इस्रायल सिनेगॉगमध्ये झाला. यादरम्यान दोन मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी प्रथम सिनेगॉगमध्ये काही द्रव फेकले आणि नंतर ते पेटवून दिले.बर्गेस म्हणतात की गुप्तचर संस्था इतर अनेक घटनांमध्ये इराणच्या संभाव्य सहभागाची देखील चौकशी करत आहे. तथापि, तो निश्चितपणे म्हणाला की ऑस्ट्रेलियातील प्रत्येक यहूदी-विरोधी घटनेसाठी इराणी सरकार जबाबदार नाही.





