एक्‍झिट पोलचे ऑस्ट्रेलिया कनेक्‍शन (अग्रलेख)

प्रत्यक्ष मतमोजणीला आता एकच दिवस शिल्लक असला तरी एक्‍झिट पोलचे कवित्व अजूनही संपलेले दिसत नाही. एनडीए आघाडीला भरघोस यशाचे भाकीत करणाऱ्या एक्‍झिट पोलनंतर मनोबल खचलेल्या यूपीए आणि अन्य विरोधी पक्षांच्या समर्थकांसाठी सध्या ऑस्ट्रेलियातील नुकत्याच संपलेल्या निवडणुकीतील एक्‍झिट पोलचा उतारा दिला जात आहे. कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी या बाबीकडे ट्विटरद्वारे लक्ष वेधल्यानंतर सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाच्या एक्‍झिट पोलचीच चर्चा अधिक झाली.

ऑस्ट्रेलियात झालेल्या मतदानात विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झरव्हेटिव्ह आघाडी पराभूत होईल आणि लेबर पार्टी विजयी होईल असे अंदाज बहुतांश एक्‍झिट पोलमधून वर्तवण्यात आले होते. खुद्द पंतप्रधान मॉरिसन यांनीही आशा सोडल्या होत्या. पण प्रत्यक्ष मतमोजणीचे निकाल जाहीर झाले त्यावेळी सर्वच एक्‍झिट पोल चाचण्यांचे निकाल फोल ठरले आणि पंतप्रधान मॉरिसन यांचा पक्ष विजयी झाला. एक्‍झिट पोलच्या बोगसपणाचे हे एक ताजे उदाहरण आहे. नाईन गॅलक्‍सी ही तेथील एक अत्यंत विश्‍वासार्ह एक्‍झिट पोल एजन्सी मानली गेली आहे. अन्यही 55 संस्थांनी ऑस्ट्रेलियात एक्‍झिट पोल केले होते. असे म्हणतात की त्यातील एकाही संस्थेने विद्यमान पंतप्रधानांची आघाडी विजयी होईल असे भाकित केलेले नव्हते.

नाईन गॅलक्‍सीने लेबर पार्टीला 82 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. 151 सदस्य असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संसदेत बहुमतासाठी 76 जागांची गरज होती. प्रत्यक्ष निकालात सत्तारूढ कॉन्झरव्हेटिव्ह आघाडीला 74 आणि विरोधी लेबर पार्टीला 66 जागा मिळाल्या. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना बहुमतासाठी केवळ दोनच जागांची गरज असून ते अन्य पक्षांच्या मदतीने आपली सत्ता सहज राखू शकणार आहेत. या निकालाचे वैशिष्ट्य असे की कोणत्याही एक्‍झिट पोल संस्थांनी त्यांना पुन्हा सत्ता मिळण्याची अंधुकशीही संधी नसल्याचे नमूद केले होते. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना हा चमत्कार वाटत आहे. त्यांनी तशी प्रतिक्रियाही दिली आहे.

जीवनात चमत्कार घडू शकतात अशी आपली कायमच भावना राहिली आहे, पण निवडणूक निकालाचा हा चमत्कार मात्र आपल्याला थक्‍क करून गेला असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एक्‍झिट पोल करणाऱ्या संस्थांविषयी फारशी आगपाखड केली नाही; पण त्यांना टोमणे मारण्यास पंतप्रधान मॉरिसन विसरले नाहीत. शशी थरूर यांनी या उदाहरणाद्वारे यूपीए समर्थकांना हुरूप आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आजच कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक ऑडिओ संदेश प्रसारित केला आहे.

एक्‍झिट पोलनंतर कॉंग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. एका दिवसाच्या गॅपनंतर प्रियांकांचा हा ऑडिओ संदेश आला आहे. त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी मनोबल खच्ची होऊ देऊ नये, आपले मनोबल खच्ची व्हावे असाच त्यांचा (विरोधकांचा) प्रयत्न असावा म्हणूनच हे आकडे जाहीर झाले असावेत. तथापि, आपल्या प्रयत्नांना निश्‍चित फळ मिळेल असा विश्‍वास त्यांनी या संदेशात व्यक्‍त केला आहे. एक्‍झिट पोलवरची कॉंग्रेसची ही पहिली मोठी प्रतिक्रिया आहे. बहुधा थरूर यांच्या ऑस्ट्रेलियातील या उदाहरणानंतरच त्यांच्यातही नव्याने उत्साह संचारला असावा असे मानण्यास जागा आहे.

अन्यथा त्यांनी ही प्रतिक्रिया देण्यास एका दिवसाची गॅप घेतली नसती. या एक्‍झिट पोलनंतर अनेक स्वयंघोषित अभ्यासू पत्रकार आणि राजकीय तज्ज्ञ हिरीरीने पुढे आले असून त्यांनीही वेगळा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यप्रसुन बाजपेयी नावाच्या एका पत्रकाराने तर भाजप 153 पेक्षा अधिक जागा मिळवू शकत नाही अशी छातीठोक भूमिका मांडली आहे. सर्व चाचण्यांनी एक्‍झिट पोलची जी आकडेवारी जाहीर केली आहे ती अतिरंजित असल्याचे नमूद करणारे अनेक जण सध्या सोशल मीडियावर हा एक्‍झिट पोल कसा बोगस आहे याचे विश्‍लेषण करीत आहेत. त्यांच्या विश्‍लेषणात हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपला जितक्‍या जागा दाखवण्यात आल्या आहेत त्या फाजील आहेत आणि तेथेच एक्‍झिट पोलचे अंदाज चुकतील असे त्यांचे म्हणणे आहे.

पश्‍चिम बंगाल आणि ओडिशातही भाजपला अपेक्षेपेक्षा फारच जागा दाखवण्यात आल्या असून भाजपला तिथे इतक्‍या जागा मिळण्याची शक्‍यता या लोकांना दुरापास्त वाटत आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपचे अजून केडरच अस्तित्वात नसताना भाजप तिथे तृणमूल कॉंग्रेसला बरोबरची टक्‍कर देऊन त्यांच्या इतक्‍याच जागा मिळवेल असा अंदाज व्यक्‍त करणे हे राजकीय अपरिपक्‍वपणाचे लक्षण आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच पश्‍चिम बंगालच्या एक्‍झिट पोल निकालातही गफलत होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे.

भारतातील अलीकडच्या काळातील हा पहिला असा एक्‍झिट पोल असावा ज्यावर सहजी कोणीही विश्‍वास ठेवायला तयार नाही. भाजपचा वरचष्मा राहील, मोदीच पंतप्रधान होतील; पण त्यांना इतके एकतर्फी बहुमत अजिबात शक्‍य नाही, असे सांगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनेक जण तर भाजप पराभूतच होईल असे सांगताना दिसत आहेत आणि तेही विश्‍लेषणासह. मग इतके सगळे असताना एकजात साऱ्याच संस्था एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज कसा व्यक्‍त करीत आहेत? या प्रश्‍नावर काही जाणकार आता शेअरबाजारात अचानक एका दिवसात वाढलेल्या
निर्देशांकाकडे बोट दाखवून त्याचा याच्याशी संबंध जोडत आहेत.

एक्‍झिट पोल जाहीर झाल्यानंतर एकाच दिवसात गुंतवणूकदार तब्बल 5 लाख 33 हजार कोटींनी मालामाल झाले आहेत. याच अट्टहासासाठी हे एक्‍झिट पोल मॅनेज केले गेले असावेत, असे सांगणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. द वायर नावाच्या वेबसाईटने यंदाचे एक्‍झिट पोल कसे पूर्ण अपयशी ठरणार आहेत याचे एक विस्तृत विश्‍लेषण प्रसारित केले आहे. त्यावरही साध्या कुतूहल मिश्रित चर्चा सुरू आहे. या साऱ्या अधिक उणे चर्चांना ऑस्ट्रेलियातील फसलेल्या 55 संस्थांच्या एक्‍झिट पोलचा तडका अधिकच खुमासदार ठरला आहे. अगदीच एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीच्या मतमोजणीत आता खऱ्या अर्थाने जान आली आहे, असे म्हणायला हरकत नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.