Australia Squad Announce for T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. मिचेल मार्शकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, संघ निवडीमध्ये काही धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः २०२५ मध्ये तुफान चर्चेत राहिलेल्या एका स्टार खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. मिचेल ओवनला डच्चू, चाहत्यांना बसला धक्का २०२५ मध्ये आपल्या फटकेबाजीने क्रिकेट विश्व गाजवणारा अष्टपैलू खेळाडू मिचेल ओवन याला विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. बिग बॅश लीगमध्ये (BBL) होबार्ट हरिकेनकडून खेळताना सिडनी थंडरविरुद्ध अवघ्या ४२ चेंडूत १०८ धावा ठोकून ओवन चर्चेत आला होता. आयपीएलमध्ये प्रीती झिंटाच्या संघाने त्याला ३ कोटी रुपयांना खरेदी केले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याचा अभाव त्याला महागात पडला. का पडला ओवन बाहेर? गेल्या ५० टी-२० सामन्यांत त्याने केवळ ९८१ धावा केल्या. १३ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत त्याच्या बॅटमधून फक्त १६३ धावा काढल्या. भारतातील कामगिरी अत्यंत सुमार राहिली; ३ सामन्यांत त्याने केवळ १४ धावा केल्या. हेही वाचा – Suryakumar Yadav : टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्या पत्नीसह तिरुपती चरणी; खराब फॉर्ममधून सावरण्यासाठी साकडं, पाहा VIDEO कूपर कोनोलीची सरप्राईज एन्ट्री – मिचेल ओवन बाहेर झाला असतानाच, गेल्या १२ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या कूपर कोनोलीला थेट विश्वचषकाचे तिकीट मिळाले आहे. निवड समितीच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. फिरकीवर भर आणि नव्या दमाचे खेळाडू – आशियाई खेळपट्ट्यांचा विचार करून ऑस्ट्रेलियाने संघात फिरकीपटूंना प्राधान्य दिले आहे. अॅडम झाम्पासोबत मॅट कुन्हेमन फिरकीची धुरा सांभाळेल. मॅथ्यू शॉर्ट, मॅट कुन्हेमन आणि जेवियर बार्टलेट यांचा हा पहिलाच टी-२० विश्वचषक असणार आहे. हेही वाचा – Year Ender 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी ते महिला विश्वचषक… RCB च्या विजयापर्यंत; भारताचा अविस्मरणीय २०२५ टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी ऑस्ट्रेलियन संघ: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, पॅट कमिन्स, मार्कस स्टोइनिस, जोश हेझलवूड, नॅथन एलिस, जेवियर बार्टलेट, मॅथ्यू वेड, कूपर कोनोली, अॅडम झाम्पा, मॅट कुन्हेमन, टिम डेव्हिड, कॅमेरून ग्रीन, जॉश इंग्लिस आणि ग्लेन मॅक्सवेल.