AUS vs ENG : ॲलेक्स कॅरीचा दमदार डबल धमाका! ऑस्ट्रेलियासाठी 12 वर्षांनंतर ‘या’ खास पराक्रमाची केली पुनरावृत्ती

Alex Carey record in AUS vs ENG 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘ॲशेज’ मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने आपली पकड घट्ट केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरीने आपल्या अष्टपैलू खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याने १२ वर्षांनंतर एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
ऑस्ट्रेलियाची ३५६ धावांची मोठी आघाडी –
ॲडलेड ओव्हलवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८६ धावांवर आटोपला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला ८५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगली कामगिरी करत ४ बाद २७१ धावा केल्या असून, त्यांची एकूण आघाडी आता ३५६ धावांवर पोहोचली आहे.
ॲलेक्स कॅरीचे दोन्ही डावात ‘फिफ्टी प्लस’ स्कोअर –
या सामन्याचा खरा नायक ॲलेक्स कॅरी ठरला आहे. त्याने पहिल्या डावात १४३ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०६ धावांचे दमदार शतक झळकावले होते. त्याच्या या शतकामुळेच ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली.
दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली होती. जॅक वेधराल्ड (१ धाव), मार्नस लाबुशेन (१३ धावा) आणि उस्मान ख्वाजा (४० धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर कॅरीने डाव सावरला. त्याने ९१ चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या असून तो अजूनही मैदानावर टिकून आहे.
१२ वर्षांनंतर घडला इतिहास –
ॲशेस कसोटीच्या दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा करणारा ॲलेक्स कॅरी हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९९५ मध्ये इयान हिली* (७४ आणि ५१ धावा) आणि २०१३ मध्ये ब्रॅड हॅडिन (९४ आणि ५३ धावा) यांनी हा पराक्रम केला होता. तब्बल १२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाला अशी कामगिरी करण्यात यश आले आहे.





