Nitesh Rane : आज तुम्ही लाडके आहेत, उद्या तुम्ही…; शरद पवारांच्या आमदाराने नितेश राणेंना दिला खोचक सल्ला

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. त्यावरून सोमवारी रात्री नागपूरमध्ये मोठा हिंसाचार घडला. नागपुरात दोन गटांमध्ये झालेल्या राड्यानंतर जाळपोळ, तोडफोड झाली. या घटनेचे पडसाद विधिमंडळातदेखील उमटले.
रोहित पवारांची सरकारवर टीका
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नुकतंच मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. कोरटकर, सोलापुरकरला पकडण्यासाठी सरकारला इच्छाशक्ती लागेल. सरकार या टुकार लोकांना पाठबळ देत आहेत आणि यांचे प्रमुख नेते शांतता ठेवा म्हणून सांगत आहेत. तर दुसरीकडे सरकारमधील लोक वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. वातावरण गरम करणारे बोलून जाणारे दुसरे आहे. परंतु त्यांच्या मागील डोकं दुसऱ्यांचं आहे. सामान्य लोकांचे विषय प्रश्न सोडवत असाल तर कुठलीही कबर काढा. फक्त वातावरण दूषित करण्यासाठी औरंगजेबाचा विषय आणत आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांनी नितेश राणेंना दिला खोचक सल्ला
नितेश राणे यांचे वय कमी आहे. मंत्री झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूश होण्यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात. मात्र त्यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. तसेच आज तुम्ही लाडके आहेत, उद्या राहणार नाही. तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही असा खोचक सल्लादेखील रोहित पवारांनी नितेश राणेंना दिला.
नितेश राणे काय म्हणाले होते?
नागपूरच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना वादग्रस्त विधाने टाळण्याची तंबी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी खरंच तंबी दिली का? याबाबत आता खुद्द नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीत आपलं नाव असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.





